Mumbai University pudhari photo
मुंबई

Mumbai University : जागतिक उद्योजकता क्रमवारीत मुंबई विद्यापीठ ७४व्या स्थानी

राज्यातील एकमेव विद्यापीठ म्हणून स्थान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जागतिक उद्योजकता परिसंस्थेत मुंबई विद्यापीठाने दमदार कामगिरी नोंदवली असून, ‘पिचबुक’च्या २०२६ मधील ‘टॉप १०० युनिव्हर्सिटीज फॉर एन्त्रप्रेन्योर्स’ या जागतिक क्रमवारीत विद्यापीठाने ७४वे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या भारतातील आठ उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश असून, राज्यातील एकमेव विद्यापीठ म्हणून त्याने स्थान पटकावले आहे.

१ जानेवारी २०१५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उद्यम भांडवल उभारलेल्या कंपन्यांच्या संस्थापकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जगभरातील दोन लाख २२ हजारांहून अधिक उद्यम-समर्थित संस्थापकांच्या शैक्षणिक आणि गुंतवणूकविषयक माहितीचे विश्लेषण करून क्रमवारी निश्चित करण्यात आली.

भारतातील अव्वल १०० संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठासह आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, दिल्ली विद्यापीठ आणि बिट्स पिलानी यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाशी संबंधित ३३९ संस्थापकांनी ३१६ कंपन्यांची उभारणी केली असून, या कंपन्यांनी तब्बल १२.९ अब्ज अमेरिकी डॉलरचे भांडवल उभारले आहे. माजी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या कंपन्यांची संख्या आणि त्यांना मिळालेले उद्यम भांडवल याचा आधार घेत ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे.

‘पिचबुक’च्या जागतिक क्रमवारीतील ७४वे स्थान हे विद्यार्थ्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय सामर्थ्याची जागतिक पावती आहे. ३३९ संस्थापक, ३१६ कंपन्या आणि १२.९ अब्ज डॉलरचे भांडवल ही केवळ आकडेवारी नसून, विद्यापीठातून घडलेल्या प्रतिभेने निर्माण केलेल्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे.

नवकल्पनांना उद्योगात रूपांतरित करून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्माते बनविण्यासाठी उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम केली जात आहे,’ असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT