

मुंबई : गणेशोत्सव, दिवाळीसारख्या सण आणि सुट्टीच्या कालावधीत कोल्हापूर-मुंबई मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडा, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरूवारी मुंबईत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. कोल्हापूरच्या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुविधांचा विस्तार करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. यावेळी मुंबई येथील कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना काळात बंद झालेली मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करा. ती मुंबईपर्यंत सध्या सोडणे अशक्य असल्यास ती किमान कुर्ला किंवा पनवेलपर्यंत न्या. याबाबतच्या पर्यांयावर १५ दिवसांत ठोस निर्णय घ्या, असे सांगत आबिटकर म्हणाले, कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरु करा.महालक्ष्मी एक्सप्रेस चा वेग वाढवा, अशा सूचना आबिटकर यांनी केल्या.
या वेळी कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी आणि कोल्हापूर-बेळगाव रेल्वेमार्गांचे सर्वेक्षणाला गती द्या. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील प्रस्तावित विकासकामे तातडीने पूर्ण कर, अशी सूचना त्यांनी केली प्रवाशांसाठीच्या मूलभूत सुविधांचा दर्जा वाढवून त्यांची नियमित तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.
याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले. वंदे भारत एक्सप्रेस सह केंद्रीय पातळीवरील विषयांच्या संदर्भात लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्र्यासमवेत बैठक घेऊ असेही आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक के. के. प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम, सचिव ज्योतिबा जाधव, उपाध्यक्ष वसंतराव पुरीबुवा, संचालक सतीश मिस्त्री, सुहास शिंदे व पारधे आदींसह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.