Mumbai University Pudhari
मुंबई

Mumbai University: मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये प्रवेश रोखल्याचा आरोप; दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना गेटवर थांबवले

पाली भाषा विभागाच्या मागण्यांसाठी 190 दिवसांपासून भदंत विमांसा यांचे आंदोलन; विद्यापीठ प्रशासनाने आरोप फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उर्दू विभागात आयोजित कार्यक्रमात अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केल्यानंतर, माहितीपट दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते संशोधक विद्यार्थी आणि बौद्ध भिक्षू राजेश बाळखंडे उर्फ भदंत विमांसा यांच्या समर्थनार्थ भेट देण्यासाठी आले होते. यावेळी हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यापीठावर करण्यात आला होता. मात्र हा आरोप मुंबई विद्यापीठ प्रशासनाने फेटाळला आहे.

भदंत विमांसा गेल्या 190 दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सत्याग्रह आंदोलन करत आहेत. पाली भाषा विभागाचे जतन व विकास, स्वतंत्र ‌‘पाली भवन‌’ इमारतीचे बांधकाम, विभागासाठी योग्य अनुदान, अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाचे नूतनीकरण आणि 300 विद्यार्थ्यांसाठी नव्या वसतिगृहाच्या बांधकामाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. आयोजन समितीचे सदस्य म्हणून पटवर्धन यांनी कॅम्पसपासून जवळच असलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात कॅम्पसमध्ये जाऊन भदंत विमांसा यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच थांबवले आणि कॅम्पसमध्ये प्रवेश दिला नाही. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व लोकशाहीर संदेश गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

पटवर्धन यांनी प्रवेशद्वाराजवळच भदंत विमांसा यांची भेट घेतली. एकात्मतेचे प्रतीक म्हणून त्यांनी त्यांना गुलाबाचे फूल देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भदंत विमांसा पाली भाषेसाठी लढा देत असून त्यांना शिक्षण सुरू ठेवण्याची संधी मिळायला हवी, असे पटवर्धन यांनी सांगितले. आम्ही कलिनाजवळ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कॅम्पसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला; मात्र आम्हाला प्रवेश देण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.

संबंधितांना चौकशी करूनच प्रवेश

त्यांच्या भेटीबाबत विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली असती, तर त्यांचे स्वागत करून विद्यापीठाची भूमिका त्यांच्यासमोर मांडली असती. राजेश बाळखंडे यांनी कलिना कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींना चौकशी करूनच प्रवेश दिला जात असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने निवेदनात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT