मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र (सीडीओई)मध्ये पदवी तसेच अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आता तब्बल पाच महिने उलटले असले तरी विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तके मिळालेली नाहीत. डिसेंबर महिन्यात पहिल्या सत्राची परीक्षा होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. “अभ्यास कसा करायचा?” आणि “परीक्षेला तयारी कशी करायची?” असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
सीडीओईमार्फत दरवर्षी हजारो विद्यार्थी नोकरी सांभाळत शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र म्हणजे एकमेव पर्याय असतो. पण यंदा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अभ्याससामग्री (स्टडी मटेरियल) मिळालेले नाही अशा तक्रारी आहेत.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करण्यात आले. यामुळे काही अभ्यासक्रमांची रचना बदलली आहे. यामुळे यंदा प्रवेशाची मुदतही वाढवण्यात आली होती. 20 ऑगस्टपासून प्रवेश सुरू होऊन 11 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश पूर्ण करण्यात आले. या कालावधीत तब्बल 12 हजार 863 विद्यार्थ्यांनी सीडीओईच्या विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून पुस्तकांसाठी शुल्कही आकारण्यात आले, मात्र आजपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना एकही पुस्तक मिळालेले नाही. ऑगस्टमध्ये प्रवेश घेतला, फीही भरली, नोव्हेंबरमध्ये एकही पुस्तक मिळालेले नाही, अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
आम्ही नोकरी करून शिकतो. दिवसभरानंतर संध्याकाळी वेळ काढून अभ्यास करायचा, पण आता पुस्तकांशिवाय अभ्यास कसा करायचा? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑनलाईन पुस्तके घेवून अभ्यास करणे शक्य नाही, असेही विद्यार्थी सांगतात.
प्रथम वर्षासोबतच द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, पण यंदा ती अधिक गंभीर बनली आहे. पुस्तकांच्या अभावामुळे ऑनलाईनचा उपयोग होत नाही, कारण नोट्स आणि रेफरन्स वाचण्यासाठी पुस्तकांची गरज असते.
या प्रकरणाची दखल घेत युवासेना सहसचिव ॲड. संतोष धोत्रे यांनी सीडीओई संचालकांकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी तातडीने पुस्तके वितरित करावीत अशी मागणी केली आहे. नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचवण्यात झालेला विलंब म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे, असे धोत्रे यांनी नमूद केले आहे.
यंदा प्रवेश प्रक्रिया एनईपीनुसार करण्यात आली. सध्या सुमारे 60 टक्के विद्यार्थ्यांना मुद्रित पुस्तके देण्यात आली आहेत, तर 90 टक्के विद्यार्थ्यांना वर्गाच्या टेलिग्रामग्रुपद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून पुस्तकांची सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबरपासून पुस्तके मिळणार आहेत, असे सीडीओईकडून सांगण्यात आले.