Mumbai Underground Parking Pudhari
मुंबई

Mumbai Underground Parking: मुंबईत पार्किंग समस्येवर मोठा निर्णय; 26 विभाग कार्यालयांपुढे भूमिगत वाहनतळ उभारणार

सिद्धिविनायक मंदिर परिसरात पहिला प्रकल्प; वाढत्या वाहनघनतेमुळे महापालिकेची व्यापक योजना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेने पालिकेच्या 26 विभाग कार्यालयांच्या आधीच किमान एक भूमिगत पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले पार्किंग दादर जी उत्तर विभागात येणाऱ्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात उभारले जाणार आहे.

मुंबईतील वाढत्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न बिकट होत आहे. पुरेसे पार्किंग उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी नवनवीन उपायोजना हाती घेतल्या आहेत.

यात माटुंगा पूर्व आणि मुंबादेवी मंदिर परिसरात अत्याधुनिक पध्दतीची एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगची सुविधा उभारण्यात येत आहे. आता प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत भूमिगत पार्किंग उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान पहिल्या टप्प्यात दोन मजली भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. हे वाहनतळ पालिकेच्या दादर जी उत्तर विभागातील पहिले भूमिगत पार्किंग ठरणार आहे.

मुंबईत सर्वाधिक गाड्यांची घनता

देशातील सर्वात जास्त गाड्यांची घनता ही मुंबईत असून ती 1 हजार 900 गाड्या प्रतिकिमी इतकी आहे. ही घनता दिल्लीपेक्षा पाच पटीने जास्त आहे. त्यामुळे मुंबईत पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई शहरातील अन्य भागापेक्षा दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे गाड्या पार्क करण्यासाठी संपूर्ण दक्षिण मुंबईचा फेरा मारावा लागतो. अनेकदा पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात.

38 हजार गाड्यांसाठी पार्किंग

मुंबई शहर व उपनगरांत रस्त्यांवर 65 सशुल्क पार्किंग सध्या कार्यान्वित आहेत. त्यांची एकूण वाहन क्षमता 8,258 इतकी आहे. याव्यतिरिक्त इमारत व्यावसायिकांकडून 37 ठिकाणी सार्वजनिक पार्किंग चालवण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून येथील वाहन तळांची एकूण क्षमता 29 हजार 769 इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT