मुंबई: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, सिग्नल चुकवण्यासाठी किंवा काही मिनिटे वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एका महिन्यात तब्बल ५ हजार १९९ रॉंग साइड वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जुलैअखेर २०२६ मध्ये कारवाईचा आकडा १७ हजारांहून अधिक झाला होता.
मुंबई वाहतूक विभागाचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. दररोज साधारण ७०० ते ८०० वाहनचालकांवर कारवाई केली जात असून, काही दिवसांत हा आकडा ८०० पेक्षाही अधिक झाला आहे. एका दिवसात तब्बल ८२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
केवळ दंड नाही, गुन्हाही दाखल
रॉंग साइड वाहन चालविणाऱ्या प्रत्येक चालकाला केवळ दंड करून सोडले जात नाही. किरकोळ स्वरूपाच्या उल्लंघनांमध्ये दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र जाणीवपूर्वक आणि धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जात आहे. गंभीर प्रकरणांमध्ये वाहन जप्त करण्याबरोबरच वाहन चालविण्याच्या परवान्यावरही कारवाईची शिफारस केली जात आहे.
या मोहिमेदरम्यान दररोज साधारण १५ ते २० गुन्हे रॉंग साइड वाहनचालकांविरोधात दाखल होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
आतापर्यंत सुमारे ३५० वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा केवळ दंडवसुलीपुरता मर्यादित न राहता, धोकादायक वाहनचालकांवर फौजदारी कारवाई करण्याकडे कल वाढला आहे.
अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष
वाहतूक पोलिसांनी रॉंग साइड वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका असलेल्या ९५ ठिकाणांची ओळख केली असून त्यापैकी सुमारे ४० ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही, प्रत्यक्ष पथकांची तैनाती आणि सातत्याने कारवाईच्या माध्यमातून अशा ठिकाणी नियमभंग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रॉंग साइड वाहन चालविणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अचानक धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकाराला ‘छोटा शॉर्टकट’ समजणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, २० जुलै ते १० ऑगस्ट या २२ दिवसांच्या विशेष मोहिमेत मुंबई वाहतूक पोलिसांनी रॉंग साइड राइडिंग आणि ड्रायव्हिंगच्या प्रकरणांत ३४३ एफआयआर दाखल केले असून ३३७ जणांवर कारवाई केली होती. यावरून या नियमभंगाकडे पोलिस किती गांभीर्याने पाहत आहेत, हे स्पष्ट होते.
दुचाकीस्वार रडारवर
रॉंग साइड वाहन चालविणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण मोठे असल्याचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून दिसून येत आहे. सिग्नलवर थांबणे टाळण्यासाठी, लांबचा यू-टर्न वाचवण्यासाठी किंवा काही अंतर विरुद्ध दिशेने जाऊन पुढे जाण्यासाठी दुचाकीस्वारांकडून हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र मुंबईसारख्या दाट वाहतुकीच्या शहरात अशा प्रकारामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक अडथळा निर्माण होऊन धडक होण्याचा धोका वाढतो.