मुंबई : गेली आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामुंबईची अक्षरक्ष: कोंडी झाली होती. गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई पालघर, कल्याण डोंबिवली या सर्वच शहरांमध्ये सूर्यनारायणाचे दर्शन घडले. तर चार-पाच दिवस घरात कोंडलेल्या वसई-विरारांचीही सुटका झाली. त्यामुळे चाकरमान्यांनी थेट मुंबई गाठल्याने शहर गजबून गेले होते.
महामुंबईत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. वसई-विरार परिसर तर पूर्णपणे जलमय झाला होता. चार ते पाच दिवस येथील नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. विज नसल्यामुळे मोबाईलही बंद होते. त्यात वसई-विरार दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी असल्यामुळे लोकल सेवाही बंद होती. त्यामुळे येथील नागरिकांचा मुंबईशी संपर्क तुटला होता. मात्र बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. ढगाने व्यापलेले आकाश मोकळे झाले. त्यामुळे सकाळी सर्वच शहरातील नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.
मुंबईत दुपारी सर्वत्र कडक ऊन पडले होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. काळबादेवी, झवेरी बाजार, मुंबादेवी, दवा बाजार, क्रॉफर्ड मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसह खरेदीदारांची गर्दी दिसून आली.
पावसाचा सर्वाधिक फटका भाजी व फुल मार्केटला बसला. पावसामुळे भाजी मार्केटसह अन्य मार्केट ओस पडले होते. दुकानही बंद होती. दादरसह अनेक मार्केटमध्ये पाणी साठल्यामुळे पूर्ण व्यवहार ठप्प होते. परंतु गुरुवारपासून पुन्हा मार्केट गजबजुन गेली असून खरेदीदरांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. लोकलही वेळापत्रकनुसार धावू लागल्यामुळे प्रवाशांची गर्दी दिसून आली.
हलक्या मध्यम सरी पडण्याची शक्यता
येत्या २४ तासांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
वसई-विरारच्या पूरजन्य परिस्थितीचा मुंबईला फटका
वसई-विरार शहरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी पहाटे भाजी व फुले घेऊन दादर मीनाताई मार्केटमध्ये येतात. पण गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील शेतकरी दादरला न आल्यामुळे मुंबईकरांना महागड्या भाज्या खरेदी कराव्या लागल्या. मात्र गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे वसई-विरारचे शेतकरी आपल्या भाज्या व फुले घेऊन दादर मार्केटला दाखल झाले. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.