

ठाणे-कल्याण : कोकणात मुसळधार पावसाच्या चार दिवसाच्या इंट्रीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली ही महानगरे आणि शहापूर, मुरबाड आणि नेवाळी परिसर जलमय झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. तळाला गेलेली धरणे आता भरू लागली असून कोकणातील जगबुडी, कुंडलिका, अंबा नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावात पाणी घुसले आहे. पालघर जिल्ह्यालाही पुराचा मोठा तडाखा बसला आहे. तानस, भातसा, वैतरणा, सूर्या या सर्व धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बारवी धरणामध्ये ६० टक्के, तर अन्य धरणांत ७० टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. नवी मुंबईला पाणी देणारे मोरबा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांमधून जीव धोक्यात घालून वाहनचालकांनी प्रवास सुरू असून अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अशा बिकट परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या नगरसेविका शालिनी वाहिले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः रस्त्यावर उतरून पाण्यात बंद पडलेल्या वाहनांना धक्का देत वाहनचालकांना मदत करताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीचे शहरभरातून कौतुक होत असून अनेक नागरिकांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे स्वागत केले आहे.
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर कल्याणमधील विविध सखल भाग, चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी गुडघाभर पाणी असल्याने वाहनांची गती मंदावली, तर अनेक वाहनांचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनचालकांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याच वेळी नगरसेविका शालिनी वाहिले यांनी घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली.
पाण्यात उतरून वाहनांना धक्का देत त्यांनी अनेक वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत केली. त्यांच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून "लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आश्वासने नव्हे, तर संकटात नागरिकांसोबत उभे राहणे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अनेकांनी शालिनी वाहिले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे, पावसामुळे वारंवार जलमय होणारे रस्ते, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि नालेसफाईच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्येक मुसळधार पावसानंतर शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली जात असल्याने नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी होत आहे.
जलमय नेवाळीने उघडे पाडले प्रशासनाचे अपयश
एमआयडीसीच्या काटई पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील नेवाळी नाका परिसर गेल्या पाच दिवसांपासून जलमय झाला आहे. हजारो वाहनचालक आणि कामगारांना जीव मुठीत धरून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून दुचाकीस्वारांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
वाडेघर चौकातील वाहतूक बंद
कल्याण-डोंबिवली शहराला शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते जलमय झाले. वाडेघर चौक गुडघाभर पाण्याखाली गेला. सुरक्षेच्या कारणास्तव वाडेघर चौकातून आधारवाडी चौकाकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. या घटनेमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून महापालिकेच्या पावसाळी पूर्वतयारी, नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वाडेघर चौक परिसरात वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली.