मुंबई: राजकारणाच्या रंगमंचावर नवे पर्व सुरू होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी खास फोन करून निमंत्रण दिलं आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या निमंत्रणानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांना घरच्या गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी आमंत्रित केलं आहे. उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये संवादाची नवी दारं उघडली जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत देखील बुधवारी संध्याकाळी गणपतीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवार, २७ ऑगस्टला घरोघरी गणपती विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाचा एकत्रित दर्शनाचा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या निमंत्रणामुळे ठाकरे बंधूंच्या नात्यातील गोडवा पुन्हा दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय वातावरणात नवे रंग भरले जात आहेत.