

सुरेश पवार
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मनोमिलन मेळावा शनिवारी पार पडला. या निमित्ताने ठाकरे बंधू यांच्यातील अंतर दूर झाले. दोन दशकानंतर ते एका व्यासपीठावर आले. ठाकरे बंधूंचे भावबंधन होत असताना काँग्रेस पक्षापुढे मात्र कोंडी निर्माण झाली आहे.
ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आता युती होणार अशी चर्चा या मेळाव्यामुळे सुरू झाली आहे. आम्ही एकत्र येणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले तर राज यांची भूमिका सावध होती. पहिलीपासून हिंदी भाषा सुरू करण्याच्या विरोधात हे दोघे एकत्र आले आणि शनिवारी या निर्णयाविरोधात महामोर्चाचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा हा निर्णय मागे घेण्यात आला. पण या निमित्ताने ठाकरे बंधू यांच्यातील अंतर दूर झाले. काँग्रेस पक्ष काही मराठी विरोधात नाही. परंतु काँग्रेसचे देशव्यापी स्वरूप लक्षात घेता, काँग्रेसला सर्व भाषिकांशी नाते ठेवावे लागते. महाराष्ट्रात मराठीबरोबर हिंदी, गुजराती, उर्दू भाषिक हेही काँग्रेसचे सहानुभूतीदार आहेत. मतासाठी त्यांना सांभाळणे काँग्रेसला भागच आहे. स्वाभाविकच काँग्रेस पक्षाला मराठीसाठी भूमिका घेताना इतर भाषिकांचाही विचार करावा लागतो. ठाकरे बंधूंप्रमाणे केवळ मराठीसाठी काँग्रेसला आक्रमक आणि टोकाची भूमिका घेता येत नाही.
मुंबई महानगराचा विचार केला तर हे महानगर बहुभाषिक आहे. या महानगरात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी मराठी भाषिकांची जी 45 टक्के लोकसंख्या होती, ती आता 30 ते 35 टक्के एवढी राहिली आहे. गुजराती, राजस्थानी, बिहारी, उत्तर प्रदेशी यांच्यासह दक्षिणी भाषिकांची लोकसंख्या मुंबई महानगरीत लक्षणीय प्रमाणात आहे. पन्नास-साठ-सत्तरच्या दशकात मुंबई महापालिकेवर काँग्रेसचे अधिराज्य होते आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची रचनाही बहुभाषिक होती व आहे. बॅ. रजनी पटेल, मुरली देवरा असे गुजराती - राजस्थानी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. यावरून काँग्रेस पक्षाची बहुभाषिक रचनेची कल्पना येऊ शकते आणि आता एवढ्या वर्षांनंतरही बरीचशी पडझड होऊनही काँग्रेसचे मुंबई महानगरातील स्वरूप फारसे बदललेले नाही. मराठी भाषिकांबरोबर काँग्रेस पक्षाचे अन्य भाषिक आमदार आणि खासदार असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून पक्षाचे तीन आमदार निवडून आले. त्यात एक मराठी आणि दोन उर्दू भाषिक आमदार होते.
काँग्रेसचे मुंबई महानगरातील बहुभाषिक चित्र यावरून स्पष्ट होते आणि मराठीबाबत पक्षाला ठोस भूमिका घेता येत नाही, त्याचेही स्पष्टीकरण होते. मुंबई महापालिकेचा बिगुल वाजत असतानाच बिहार विधानसभा निवडणुकीच्या नगार्यावर टिपरी पडणार असल्याने काँग्रेसपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईतील बहुभाषिक मतदार आणि ठाकरे बंधूंचा मराठीचा अजेंडा या खिंडीत काँग्रेस पक्ष सापडला आहे. मुंबईत काँग्रेसने थोडी जरी हिंदीविरोधी भूमिका घेतली तरी बिहार निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो, याची पक्ष नेतृत्वाला जाणीव आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या तरी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता या मेळाव्याकडे फिरकला नाही, ही बाब सूचक आहे.
महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाला या मेळाव्यात सामील होणे शक्यच नव्हते. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचाही प्रश्न उभा राहिला आहे. आता ठाकरे यांच्या बरोबर राज ठाकरे एकत्र आले तर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकावेळी जागावाटपाचाही चांगलाच घोळ होऊ शकतो. ठाकरे बंधू अथवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना फार अडचण येण्याची शक्यता नाही; पण जागावाटपातील तडजोडीत काँग्रेसला मोठी झळ बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हिंदी विरोधी आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरणांना काही प्रमाणात नवे वळण मिळण्याची शक्यता दिसत आहे. त्यात काँग्रेस पक्षाची स्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशीच होण्याची शक्यता आहे. त्यातून बाहेर पडायचे तर स्वबळावर लढायला सैनिक कुठून आणायचे असा प्रश्न आहे. या सार्या घडामोडीत काँग्रेस नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.