

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. त्याबाबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिली.
नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात नाशिक दौर्यावर असलेले खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करत भाजपवरही हल्ला चढवला. जिल्हा परिषदेची निवडणूक कशा प्रकारे लढवायची, यावर आमचे मंथन झाले असून आम्ही ताकदीने जिल्हा परिषदा, नगर पंचायती लढणार आहोत. मुंबईसह अशा अनेक महानगरपालिका आहेत, तेथे आमची एकमेकांसोबत चर्चा सुरू आहे.
भाजपाने देश धर्मांध केला
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि खाण्या-पिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे, असा सवाल करत ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी खाण्या-पिण्याची बंधने लादली नव्हती, असे सांगत राऊत म्हणाले, आज धार्मिक सण नाही तर विजय उत्सव आहे. लोकांनी जे हवं ते खायचं, हवं ते प्यायचं, बेधुंद व्हायचं, असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे. पण हा धार्मिक देश भाजपाने धर्मांध केला. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधने लादली, असा आरोप त्यांनी केला.
स्वातंत्र्य दिनी मांस खायचे नाही, मांस विक्री बंद, हा नवीन नियम कोणी आणला, असा सवाल करत कत्तलखाने बंद असा निर्णय काँग्रेस काळात झाला असेल. शासकीय सुट्ट्या असतात, त्यात ती एक सुट्टी असते. पण त्यात तुम्ही धर्मांधता आणली, असा आरोपही राऊत यांनी केला.