मुंबई : तेजाचा, प्रकाशाचा अन् मांगल्याचा सण असलेल्या दिवाळीच्या तेजाने सोमवारी पहाटेपासूनच अवघे शहर उजळून गेले. दिवाळीचा मुख्य दिवस असलेल्या नरकचतुर्दशीनिमित्त पारंपरिक विधींनी दिवाळीच्या तेजपर्वाला प्रारंभ झाला. पहाटेपासून रांगोळ्या, अभ्यंगस्नानाचा गंध, फराळाचा आस्वाद, भेटीगाठीचा ओलावा आणि शुभेच्छांची बरसात अशा वातावरणात दिवाळीला सुरुवात झाली.
सोमवारी पहाटे घरोघरी दिवाळीने आनंदाच्या पायघड्या घातल्या. रंगीबेरंगी रांगोळ्यांची सजावट करण्यात गृहिणी तल्लीन झाल्या होत्या. पणत्यांच्या प्रकाशमय ओळींनी आसमंत उजळला. आकाशदिव्यांची झुंबरे डोलू लागली. नवीन कपड्यांची नवलाई बहरली होती. सायंकाळी सहानंतर नेत्रदीपक रोषणाईने सारे शहर उजळले. आतषबाजी करण्यात आली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. तेल, उटण्याच्या सुगंधात अभ्यंगस्नान करण्यात आले. त्यानंतर सहकुटुंब फराळाच्या पदार्थांनी आनंदाची गोडी वाढवली.
गेल्या दोन दिवसांपासूनच महामुंबईतील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. दादर, भुलेश्वर, बोरिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, घाटकोपर, ठाणे, कल्याणच्या बाजारपेठांत कपडे, सोने-चांदी, घरगुती सजावटीच्या वस्तू, फटाके, मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. दादरला तर अक्षरश: जत्रेचे स्वरुप आले आहे. ऑनलाइन खरेदीचा जमाना असला तरी प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये जाऊन खरेदी करण्याची सवय या काळातही कायम असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी घेत कुणी शुभेच्छा दिल्या. तरुणाईने सोशल मीडियाद्वारे दिवाळी सेलिबेशनचे रिल्स, स्टेटस, संदेश, फोटो शेअर करत शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
दादर फूल मार्केट तेजीत
दादर फूल मार्केट ग्राहकांनी तुडुंब भरले आहे. मुंबईसह आसपासच्या उपनगरातील नागरिकांच्या गर्दीमुळे मार्केटमध्ये अक्षरशः मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती आहे. फूल मार्केटमध्ये सजावटीसाठी लागणारे गुलाब, अष्टर, कामिनी आणि खास करून कमळाच्या फुलांना मोठी मागणी आहे. दिवाळीच्या आधी पडलेल्या पावसामुळे ओल्या फुलांना अर्धी किंमत मिळत आहे, तर चांगल्या टवटवीत फुलांना चांगला भाव मिळत आहे.
दिवाळी सणातील महत्त्वाचा विधी असलेले लक्ष्मीपूजन मंगळवारी केले जाणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत लक्ष्मीपूजन साहित्य तसेच झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीतही भर पडली आहे. प्रभादेवीचा पूल पाडल्यामुळे आधीच दादरमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच आता दिवाळीच्या खरेदीमुळे ठिकठिकाणी रस्ते, गल्ल्यांमध्ये वाहने, दुचाकी यांच्याही रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास टॅक्सीचालकही तयार नाहीत असे चित्र शनिवार, रविवारपासून सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.