महेश पांचाळ
मुंबई: मुंआलिशान घरात गुंतवणूकदारांना बोलवायचे, शेअर बाजारात भरघोस नफा कमावत असल्याचे एक्सेल शीटवरून दाखवायचे आणि दरमहा तीन ते पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधींची गुंतवणूक करून घ्यायची.
विश्वास संपादन झाल्यानंतर पैसे परत मागताच फोन बंद करून मुंबईतून पसार व्हायचे. आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) केलेल्या तपासातून रोहन भूषण शेठ याच्या कथित फसवणुकीची ही धक्कादायक पद्धत समोर आली आहे.
महाराष्ट्र व गुजरातमधील ४२ गुंतवणूकदारांचे ३० कोटी २६ लाख रुपये बुडविल्याचा आरोप शेठवर करण्यात आला आहे. ईओडब्ल्यूने नुकतेच न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ३७ साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे.
रोहन शेठ हा सायन आणि माटुंगा येथील आलिशान सदनिकांमध्ये गुंतवणूकदारांच्या भेटी घेत असे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नफा मिळत असल्याचे भासविण्यासाठी एक्सेल शीटमधील नफा विवरणपत्रे गुंतवणूकदारांना दाखवली जात होती. मात्र, या आकडेवारीत फेरफार करून बनावट नफा दाखविला जात असल्याचा ईओडब्ल्यूचा आरोप आहे.
एका कुटुंबाचीच १०.८१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक
कांदिवलीतील निवृत्त नागरिक संजय हिरालाल शाह यांच्या तक्रारीने या प्रकरणाचा वाचा फुटली. शाह यांनी आपण आणि आपल्या कुटुंबाची मिळून १०.८१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीतून केला.
पैसे थांबले अन् मुंबईतून पलायन
डिसेंबर २०२५पासून गुंतवणूकदारांना पैसे मिळणे बंद झाल्यानंतर शेठचा फसवणुकीचा प्रकार उघड होण्यास सुरुवात झाली. तो दोन मोठ्या बॅगा घेऊन मुंबईबाहेर गेल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून समोर आले. त्यानंतर ईओडब्ल्यूने त्याचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान गुजरातमधील एका क्रेडिट कार्ड व्यवहाराचा माग काढण्यात आला. त्यातून मोबाईल खरेदीचा तपशील आणि आयएमईआय क्रमांक मिळविण्यात आला. पोलिसांनी त्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या जीपीएस माहितीचा तसेच टोलनाक्यांवरील व्यवहारांचा आधार घेतला. अखेर तो वलसाडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाजवळ तीन दिवस पाळत ठेवत अटक केली.
गुंतवणूकदारांसमोर बदलला लूक
फसवणुकीच्या या कथित कारनाम्यात गुंतवणूकदारांच्या भेटीवेळी शेठ उच्च दर्जाचा विग वापरत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो दाट केस असलेल्या व्यक्तीच्या रूपात गुंतवणूकदारांसमोर वावरत होता. प्रत्यक्षात तो टक्कल असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. विगची देखभाल करणाऱ्या सलून कर्मचाऱ्यांचे जबाबही तपास यंत्रणेने नोंदवून घेतले आहेत.
तीन नावांनी बदलली ओळख
तपासादरम्यान शेठने जयेश हसमुखभाई शाह, राहुल अतुलभाई पारेख आणि रोहन भूषण शेठ या तीन नावांचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा ईओडब्ल्यूने केला आहे. पोलिसांनी या वेगवेगळ्या ओळखींची कागदपत्रे, बँक खाती आणि डिमॅट खात्यांची माहिती तपासली. या तपासातून तीन वेगवेगळ्या नावांमागे एकच व्यक्ती असल्याचे जोडणे तपासातील महत्त्वाचा भाग ठरले.