मुंबई: रस्ता सुरक्षतेसाठी मुंबई महानगरपालिकेने अपघात प्रवण क्षेत्रामध्ये विविध सूचना फलकांसह दिशादर्शक फलक, दुभाजक, वाहतूक बेट उभारणे व अन्य कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून तब्बल १४ कोटी १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई शहरात वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह लहान मोठे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ४७५ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या शहरातील रस्त्यांचे जाळे २ हजार कि.मी. इतके आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेसाठी मुंबई पालिकेने ठोस पावले उचलली आहेत.
मुंबई शहर व उपनगरांतील अपघात प्रवण क्षेत्राची यादी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली असून त्यामध्ये ४८ अपघात प्रवण क्षेत्र नमूद आहेत. त्यानुसार, शहर , पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे विभागांतील अपघात प्रमाण क्षेत्र येथे थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग (रंगकाम) करणे, मध्य विभाजक (डिव्हायडर) उपलब्ध करून देणे, वाहतूक बेटे बांधणे आदी सुधारात्मक कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील प्रमुख अपघातप्रवण क्षेत्र
छेडा नगर (घाटकोपर)
एससीएलआर ब्रिज (चेंबूर)
अमर महल जंक्शन (पूर्व द्रुतगती महामार्ग)
रमाबाई नगर (घाटकोपर)
गोदरेज घोडा गेट सिग्नल (विक्रोळी)
आयआयटी मेन गेट (पवई)
ऐरोली टोल नाका (ऐरोली-मुलुंड रस्ता)
माहीम कॉजवे जंक्शन (माहीम फाटकजवळ)
दुर्गा नगर जंक्शन (जे.व्ही.एल.आर. रोड, जोगेश्वरी)
शिंपोली नाका (लिंक रोड, बोरीवली पश्चिम)
प्रियदर्शनी जंक्शन (सायन-चेंबूर)
किंग सर्कल जंक्शन (माटुंगा पूर्व)
अंधेरी (पूर्व) - पश्चिम द्रुतगती महामार्ग