Mumbai Restaurant Gas Supply Pudhari
मुंबई

Mumbai Restaurant Gas Supply: आखाती युद्धाचा परिणाम मुंबईत; हॉटेल्सचा गॅस पुरवठा खंडित

पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश; गॅसअभावी मुंबईतील रेस्टॉरंट व्यवसायावर संकट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / नवी मुंबई : आखातात युद्धाचा भडका उडाल्याने संभाव्य परिस्थिती विचारात घेऊन आताच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा गॅस पुरवठा बंद करा,असे आदेश पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम अणि भारत पेट्रोलियमला दिले असून मुंबईचा हॉटेल उद्योग शुक्रवारपासून ‌‘गॅस‌’वर गेला आहे. मुंबईच्या अनेक भागांतील रेस्टॉरंट्सचा गॅस पुरवठा बंदझाल्याने आता केंद्राकडे धाव घेण्याचे आहार (इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन) या हॉटेलचालकांच्या संघटनेने ठरवले आहे.

आखाती युद्धाची झळ आता मुंबईतही बसू लागली असून मुंबईच्या अनेक भागांत गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. दादर, जोगेश्वरी, अंधेरीत गॅसपुरवठा खंडित झाल्याने हॉटेलचालक हवालदिल झाले. सध्या विस्कळीत गॅस पुरवठा आहे, तो शंभर टक्के बंद झाल्यास मुंबईतील हॉटेल व्यवसायच धोक्यात येईल, अशी चिंता ‌‘आहार‌’चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी व्यक्त केली. मुंबईतील आठ हजारांवर रेस्टॉरंट्स आहार संघटनेशी संलग्न असून महाराष्ट्रातील हॉटेल चालकांच्या 65 संघटनाही आहारशी जोडल्या गेल्या आहेत. या व्यवसायात राज्यभरात 20 लाख लोक काम करतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 60 टक्के चाकरमानी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर आपली भूक भागवतात. अशा हॉटेल्सचा गॅस पुरवठा बंद करण्याचे मोठे परिणाम त्यामुळे संभवतात. त्याचा विचार करता सरसकट गॅस पुरवठा बंद न करता रोजच्या पुरवठ्यात 20 टक्के कपात करावी, अशी सूचनाही शेट्टी यांनी केली.

मुंबईमध्ये बहुतांश पाईप गॅसची सुविधा आहे. त्याच्या पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही किंवा हा पुरवठा अबाधित राहावा म्हणूनच व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध आणले गेले आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पत्रातच तसे नमूद केले आहे.

‌‘आहार‌’कडे दाखल झालेल्या तक्रारींनुसर लोअर परळ भागात शुक्रवारपासून हॉटेल्सना गॅस पुरवठा झालेला नाही. सिलिंडर्स मिळालेच नाही तर आम्हाला शटर खाली करावे लागेल, असे उडपी श्रीकृष्णा या हॉटेलचालकाने कळवले. सायन भागातील हॉटेल्स पूर्णतः सिलिंडर्सवर अवलंबून असतात. तिथे पाईप गॅस पोहोचलेला नाही. या भागातही गॅस पुरवठा झाला नसल्याचे हॉटेलचालकाने सांगितले. गॅसच नाही तर रेस्टॉरंट चालवायचे कसे, असा सवाल माटुंग्यातील हॉटेल चालकांनी केला.

नवी मुंबई : गॅस बुकिंग केल्यानंतर एका दिवसात मिळणाऱ्या सिलिंडरसाठी दोन ते तीन दिवस ग्राहकांना वाट पाहावी लागत असून सिलिंडरसाठी रांगा लागल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. त्यातच एचपी गॅस वितरक कंपनीने आता पहिले सिलिंडर बुकिंग केल्यानंतर 21 दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर बुकिंग करता येईल हा नियम कडक केला आहे.

(छाया ः सुमित रेणोसे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT