Railway Ticket Rule (File Photo)
मुंबई

Railway Ticket Rules 2025 | आधारप्रमाणित वापरकर्त्यांनाच आता रेल्वेचे तत्काळ तिकीट

Stop Ticket Agents | एजंटगिरीला आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Tatkal Ticket Booking

मुंबई : रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित करणे सामान्य माणसासाठी कठीण काम होऊन बसले आहे. कारण तत्काळ तिकीट आरक्षणासाठी एजंटगिरी फोफावली आहे. यामुळे आयआरसीटीचे संकेतस्थळ ठप्प होते आणि सामान्य नागरिकांना तत्काळ तिकीट आरक्षित करता येत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ तिकीट आरक्षणात महत्त्वाचे बदल केले आहे. यानुसार एक जुलै 2025 पासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित (बुक) करू शकणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी सर्व विभागांना यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. रेल्वेचे तत्काळ तिकिटाचे फायदे सामान्य वापरकर्त्यांना मिळावेत याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले. नव्या नियमांनुसार एक जुलैपासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपवर तत्काळ तिकिटे आरक्षित करू शकतील.

15 जुलैपासून संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काऊंटरवर आणि अधिकृत एजंटद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांसाठी बुकिंगच्या वेळी वापरकर्त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवणे आवश्यक असेल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

अधिकृत एजंटला तिकीट बुकिंगसाठी वेळेचे निर्बंध

अधिकृत एजंटकडून होणारी मोठ्या प्रमाणात तिकीट बुकिंग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांत ओपनिंग डे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एसी क्लासेससाठी हे निर्बंध सकाळी 10 ते सकाळी 10.30 आणि नॉन एसी क्लासेससाठी, सकाळी 11 ते सकाळी 11.30 पर्यंत लागू आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

आयआरसीटीसीला आधार लिंक करा

सर्व रेल्वे प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येकाला त्यांच्या आयआरसीटीसी वापरकर्ता प्रोफाईलशी आधार लिंक करण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT