Mumbai local Train | ठाण्याच्या पुढे धीम्या मार्गावर १५ डबा लोकल ?

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेचे नियोजन
Mumbai local Train
ठाण्याच्या पुढे धीम्या मार्गावर १५ डबा लोकल ?file photo
Published on
Updated on

मुंबई : ठाणे स्थानकापुढे धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालविण्यासाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन मध्य रेल्वे करीत आहे. १५ डबा लोकलची संख्या वाढल्यास दिवसाला अतिरिक्त सुमारे सव्वा दोन लाख प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे ठाणे स्थानकापुढील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्य मार्गावरील उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य पायाभूत सुविधांच्या सुधारणांची योजना आखत आहे. या प्रकल्पात ठाण्यापलीकडे सर्व उपनगरीय स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. योजनेनुसार गोष्टी घडल्यास, मुख्य मार्गावरील ठाण्यापलीकडील सर्व स्थानकांवर पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस १५ डब्यांच्या लोकल धावू शकतील. सध्या, फक्त डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर केवळ जलद मार्गावर १५ डब्यांच्या लोकल धावत असून १५ डब्यांच्या केवळ २२ फेऱ्या धावतात. ठाणे स्थानकांपुढे किफायतशीर दरातील वाढत्या गृह संकुलांमुळे प्रवासी संख्या वाढते आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये लोकलला प्रचंड गर्दी असते. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालविण्याची व्यवहार्यता तपासत आहे. त्यासाठी ठाणे आणि कल्याण दरम्यान १५ डबा लोकल चालविण्यासाठी धीम्या मार्गावरील सर्व प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी व्यवहार्यतेचा अभ्यास केला जात आहे. कल्याण-आसनगाव आणि कल्याण-बदलापूर दरम्यानच्या प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम यापूर्वीच मंजूर आहे. बदलापूर- कर्जत आणि आसनगाव-कसारा मार्गावरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी प्रस्ताव पाइपलाइनमध्ये आहेत. हे प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

सध्या सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर १५ डबा लोकल बसू शकतात. प्लॅटफॉर्म पाच आणि सहाचा विस्तार करण्याची योजना विचाराधीन आहे. प्लॅटफॉर्म विस्ताराव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने कुर्ला आणि कळवा कारशेडजवळ प्रस्तावित स्टेशनसाठी अतिरिक्त १५ डबा लोकल पार्किंगसाठी जागा देखील निवडल्या आहेत. प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम आणि इतर तांत्रिक काम पूर्ण झाल्यावर, मध्य रेल्वे १२ डब्यांच्या गाड्यांपैकी किमान २०० गाड्यांचे १५ डबा लोकलमध्ये रूपांतर करू शकेल. म्हणजेच सुमारे ६०० डबे वाढतील. यामुळे अतिरिक्त ५० गाड्या सुरु केल्या जाऊ शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news