मुंबई : मुंबई-पुणे दरम्यान लवकरच सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी केली. कोकणवासीयांच्या 'सीएसएमटी-सावंतवाडी रोड' या नियमित रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.
रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, या मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव आणि पुण्याला बाकरवडी खाण्यासाठी जाता येईल, असा कॉरिडॉर आम्ही तयार करत आहोत. मुंबई ते हैदराबाद दरम्यान सव्वातीन तासात प्रवास करणे शक्य होईल. पुढे पुणे ते हैदराबाद नवीन कॉरिडॉर २ तास १५ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे मुंबई ते हैदराबाद दरम्यान सव्वातीन तासांत प्रवास होईल.
सोबत प्रस्तावित सुरत-दानकुनी पूर्व-पश्चिम रेल्वे कॉरिडॉरमुळे महाराष्ट्रातील रेल्वे सुविधा नसलेल्या अनेक भागांना कनेक्टिव्हिटी वाढेल. आणि औद्योगिक आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असेही वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईकरांशी संवाद साधताना अश्विनी वैष्णव म्हणाले, मुंबईसह परिसरात रेल्वेची १८ हजार कोटींची कामे सुरू आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचे काम रोखले होते. परंतु, ठाकरे मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू झाले.
मुंबईतील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. सध्या ३२०० लोकलच्या फेऱ्या होतात. त्या ३५०० पर्यंत नेणार आहोत. १५ डब्यांच्या लोकलही वाढवत आहोत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि लोकलमधील गर्दी कमी होईल असा विश्वास वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला.
२०२७ मध्ये पहिली एसी लोकल
मुंबईसाठी नव्या २३९ एसी लोकल तयार करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २०२७ मध्ये यातील पहिली एसी लोकल येईल. त्यानंतर २०३०पर्यंत सर्व एसी लोकल मुंबईत धावतील, असेही ते म्हणाले.
गणपतीसाठी ३७० गाड्या
गेल्या निवडणुकीत आम्ही गणपतीत ३०० पेक्षा जास्त स्पेशल ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. यंदा आम्ही ३५० स्पेशल ट्रेन सुरू करत आहोत. गरज भासल्यास आखणी २० स्पेशल ट्रेन सुरू करणार आहोत, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले.