Mumbai Pune Expressway Accident video Pudhari
मुंबई

Mumbai Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 'मिसिंग लिंक' बोगद्यात फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात भरधाव फॉर्च्युनरने टेम्पोला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' बोगद्यात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोर असलेल्या आयशर मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले.

मृत व्यक्तीची ओळख तुषार भूमकर (वय अंदाजे 30 ते 35 वर्षे) अशी आहे. फॉर्च्युनरमधील इतर चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, मालवाहू टेम्पोतील प्रवासीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

या अपघाताचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फुटेजमध्ये भरधाव फॉर्च्युनर कार टेम्पोला मागून धडक देताना दिसते. धडकेचा जोर इतका होता की टेम्पो अंशतः उलटला, तर कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

टेम्पोमध्ये होती भाजीपाला वाहतूक

अपघातग्रस्त आयशर टेम्पोमध्ये भाजीपाल्याची वाहतूक सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळची (MSRDC) रुग्णवाहिका, बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

काही काळ वाहतुकीवर परिणाम

अपघातानंतर काही काळ 'मिसिंग लिंक' बोगद्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, बचावकार्य पूर्ण करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

वेगावर पुन्हा प्रश्नचिन्ह

या भीषण अपघातानंतर 'मिसिंग लिंक' बोगद्यातील अतिवेगाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नव्याने सुरू झालेल्या या मार्गावर वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे आणि बोगद्यात सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT