Konkan Farmers Protest: कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आज मुंबईत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेल्या शेतकरी आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण चांगलेच तापले. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानातील बदल, उत्पादनात घट आणि आर्थिक तोट्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली 22 हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नुकसानभरपाई वाढवावी आणि इतर मागण्यांकडे लक्ष द्यावे, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्याकडे मोर्चा नेण्याचा आंदोलकांचा प्लॅन होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या थेट मांडण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ताब्यात घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही शांततेत आंदोलनासाठी जमलो होतो. कोणताही कायदा मोडला नव्हता. तरीही पोलिसांनी अचानक येत आम्हाला धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी पोहोचण्याआधीच कारवाई करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
शेट्टी यांनी राज्य सरकारवरही टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत असूनही सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर अनेकदा गेले, पण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतापाची लाट उसळली असून, या आंदोलनाला पुढे आणखी तीव्र स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील फळ उत्पादकांचा प्रश्न आता केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.