मुंबई : यंदाच्या दिवाळीत मुंबईच्या गृहखरेदी बाजारात मोठा उत्साह दिसून आला. १ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ३ हजार ६८३ मालमत्तांची विक्री झाली. गेल्या चार वर्षांतील दिवाळीचा विचार करता यंदाच्या दिवाळीत झालेली घरांची विक्री सर्वाधिक आहे.
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, दिवाळीच्या ११ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ६८३ मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी दिवाळीत ३ हजार ६६८ मालमत्तांची विक्री झाली होती. यावर्षी त्यात ०.४ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी ३३९ कोटींचा महसूल जमा झाला होता. यावर्षी त्यात १३ टक्के वाढ होऊन ३८४ कोटींचा महसूल जमा झाला. नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.
मुंबईतील वाढत्या पायाभूत सुविधा आणि सणासुदीचा काळ यांचा एकत्रित परिणाम गृहखरेदी बाजारावर दिसतो आहे. मुद्रांक शुल्कात झालेली १३ टक्के वाढ ही महागड्या घरांच्या खरेदीचा उत्साह दर्शवते. मोठ्या आकाराच्या आलिशान घरांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्याने मुद्रांक शुल्क संकलनात मोठी वाढ दिसून आली.
दिवाळी वर्ष- नोंदणी- महसूल (कोटींत)
दिवाळी- २०२३ -३३४६ -२५२
दिवाळी -२०२४ -२३३९ -२३१
दिवाळी- २०२५ -३६६८- ३३९
दिवाळी -२०२६ -३६८३ -३८४