टोटल स्टेशन तंत्रज्ञानाद्वारे पवई तलावाचे होणार सीमांकन  
मुंबई

Mumbai News : टोटल स्टेशन तंत्रज्ञानाद्वारे पवई तलावाचे होणार सीमांकन

जलविभागाच्या वतीने विस्तृत सर्वेक्षण आराखडा तयार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवई तलावाच्या अचूक सीमांकनासाठी मुंबई महापालिकेने व्यापक सर्वेक्षण हाती घेतली आहे. यासाठी तब्बल 1.78 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. तलावाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागांमध्ये सीमारेषांविषयी स्पष्टता नसल्याने विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे टोटल स्टेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

पवई तलावाच्या भू सीमांबाबत वेस्टीन हॉटेल आणि आयआयटी मुंबई यांच्यात सतत वाद होत असल्याने तलावाचे निश्चित सीमांकन करण्याचे मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर जलविभागाने विस्तृत सर्वेक्षण आराखडा तयार केला आहे. या कामासाठी सहा कंत्राटदारांनी निविदा दाखल केली होती. तांत्रिक परिक्षणानंतर सर्वात कमी दर असलेल्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. महापालिकेने या सर्वेक्षणासाठी 12 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. यातील काही निधी चालू आर्थिक वर्षात दिला जाणार आहे. तर उर्वरित रक्कम पुढील अंदाजपत्रकातून करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली.

पवई तलावाची निर्मिती 1890 साली करण्यात आली असून, एकूण 223 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाचा परिघ 10.60 किलोमीटर असून, 5 हजार 455 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पूर्वेकडील किनार्‍याचे सीमांकन अद्याप स्पष्ट नाही. वाढत्या अतिक्रमणांमुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी होत असल्याने तलाव आणि त्यालगतचा स्वतःचा भूभाग सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याविषयी पालिका अधिकारी म्हणाले की, या सर्वेक्षणामुळे पवई तलावाच्या सीमांविषयी पूर्ण स्पष्टता मिळेल आणि भविष्यातील विकासकामांना योग्य दिशा देणे शक्य होईल. तसेच अतिक्रमणांविरुद्धची कारवाई अधिक ठोसपणे करता येणार आहे.

अशी असणार प्रक्रिया

  • टोटल स्टेशन तंत्रज्ञानाद्वारे तलाव परिसराचे अचूक सर्वेक्षण करणे. नकाशे व अभिलेख तयार करणे,

  • माहिती शहर सर्वेक्षण विभाग व विकास आराखड्यात समाविष्ट करणे.

  • महापालिकेच्या भूखंडांची कागदपत्रे एकत्र करणे.

  • तलावाभोवती काँक्रीट सीमांकन खांब उभारणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT