

मुंबई : वर्षअखेरीस मेट्रो-2 ब आणि मेट्रो-9 मार्गिकांचे लोकार्पण केले जाईल आणि नवीन वर्षात आणखी दोन मेट्रो मार्गिकांचा पर्याय खुला होईल अशी अपेक्षा होती; मात्र सोमवारी सुरू झालेल्या आचारसंहितेमुळे लोकार्पणासाठी महिनाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गुंदवली ते दहिसर मेट्रो-7 मार्गिकेचा विस्तार म्हणून दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा तयार असून त्यावर सीएमआरएस चाचणी नुकतीच करण्यात आली. लवकरच या मार्गिकेला सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल. मात्र आचारसंहितेमुळे तिचे लोकार्पण होणार नाही. मेट्रो-2 अ मार्गिकेचा विस्तार करून अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो-2 ब मार्गिका उभारली जात आहे. या मार्गिकेचा मंडाळे ते डायमंड गार्डन हा टप्पा तयार आहे.
मेट्रो-2 ब चे 8 ऑक्टोबरला भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यासोबत लोकार्पण नियोजित असतानाही सुरक्षा प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले; मात्र पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पण होऊ शकले नाही. 25 डिसेंबरला मेट्रो-9 आणि 2 ब यांचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा होती; मात्र आता आचारसंहिता लागू झाल्याने लोकार्पण पुढील वर्षीच होईल.