मुंबई

Sanjay Raut : मुंबईच्‍या राजकारणात गुजराती VS मराठी कोठून आलं? संजय राऊत स्‍पष्‍टच बोलले

महाराष्ट्रासह मराठी माणसाच्या लढ्यात भाजपचा सहभाग नव्हताच

पुढारी वृत्तसेवा

कृपाशंकर सिंग यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही. हाच भाजपचा अजेंडा आहे.

Sanjay Raut on Marathi vs Gujarati debate

मुंबई : "एकेकाळी मुंबईमध्ये गुजरातचा शासकच मराठी होता. बडोदाचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते; मग तसं म्हटलं तर गुजरात महाराष्ट्राचाच भाग झाला. ज्या गुजरातवर मराठ्यांचे साम्राज्य आणि राज्य होतं गायकवाडांच त्या गुजरातबरोबर आमच भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबईत गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई कधीच नव्हती. मात्र केंद्रात मोदी-शहा यांचे राज्‍य आल्‍यापासून त्यांनी गुजराती समाजाविरुद्ध मराठी असा राजकारणासाठी रंग दिला आहे.बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच सांगितले की, गुजराती समाजाची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू; पण यांना फक्त लक्ष्मीच राज्य आणायच आहे. भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्‍यमांशी बोलताना केला.

भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर नको

आज मुंबईतील मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा आहे. आमच्यासोबत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आहे. या तिन्ही पक्षांच्या मागे जनता आहे. अशा वेळी काँग्रेस एका बाजूला उभी असून अमराठी, परप्रांतीय मते मिळावीत यासाठी ‘मुंबईचा महापौर अमराठी करू’ असा अजेंडा भाजप समोर आणत आहे, असा आरोपही संजय राऊत त्यांनी केला.

मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालण्याचा डाव

कृपाशंकर सिंग यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही. हाच भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठीच भाजपने कृपाशंकर सिंग यांची नेमणूक केली आहे. ते भाजपचे ‘बोलके पोपट’ असून अमराठी–मराठी वाद निर्माण करून मराठी माणसाला मुंबईच्या महापालिकेतील नेतृत्वापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.आधी वातावरण निर्मिती केली जाते, नंतर चाचपणी होते. मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालण्याचा हा डाव आहे. कृपाशंकर सिंग यांची वक्तव्ये ही अनवधानाने नसून भाजपची ठरवून केलेली रणनीती आहे. परप्रांतीय मतदारांना शिवसेना, मनसे आणि मराठी माणसाविरुद्ध मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यानंतर योगी आदित्यनाथसारखे नेते येथे येणार आहेत. भाजपच्या उमेदवारांमध्येही परप्रांतीयांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

भाजपचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या लढ्यात सहभाग नव्हताच

भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कधीही लढलेला पक्ष नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या पक्षाचा कधीच सहभाग नव्हता. महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादाच्या संघर्षातही भाजप कुठेच नव्हता. असा पक्ष महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील, अशी अपेक्षा कोणीही करू नये.महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात शिवसेनेचा सहभाग होता. काँग्रेसचे नेते चिंतामणराव देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार, कम्युनिस्ट पक्ष, राज्यातील मुस्लिम समाजाचे नेते सहभागी होते. शाहीर अमर शेख यांनी अख्खा महाराष्ट्र जागा केला होता. अशा असंख्य लोकांचा त्या लढ्यात सहभाग होता; मात्र भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना–मनसेचा संयुक्त जाहीरनामा लवकरच

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संयुक्त वचननाम्याच्या तयारीवर काम करत आहेत. मुंबईचा विकास, मराठी माणसाचे हित आणि अंमलात आणता येतील अशा योजनांचा त्यात समावेश असेल. मराठी मतदारांचा विचार करूनच हा जाहीरनामा तयार केला जात आहे.शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त जाहीरनामा म्हणजेच वचननामा ४ तारखेला प्रसिद्ध केला जाईल. त्या दिवशी वचननाम्याचे उद्घाटन आणि प्रकाशन होईल. त्यावर दोन्ही पक्षांकडून अंतिम काम सुरू असून आज ते पूर्ण होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह एमएमआर परिसरात होतील. त्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगर, शिवतीर्थ, मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे संयुक्त सभा होतील. नाशिकमध्येही संयुक्त सभा होणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

नार्वेकरांचे कृत्य विधानसभेच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही

विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने गेल्या चार दिवसांपासून राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत, असे दृश्य यापूर्वी कधी पाहिले नव्हते. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष होते; मात्र अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते शिवसेनेच्या कोणत्याही व्यासपीठावर उपस्थित राहिले नाहीत, कारण त्यांच्यावर घटनात्मक बंधन होते. दत्ताजी नलावडे हेही विधानसभेचे अध्यक्ष असताना कोणत्याही राजकीय व्यासपीठावर गेले नाहीत. मात्र सध्या ज्या पद्धतीने संविधान आणि नियमांचा भंग सुरू आहे, ते पाहून मुख्यमंत्रीही गप्प आहेत, उलट त्याला प्रोत्साहन देत आहेत. अशा परिस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून केलेले कृत्य अजिबात शोभणारे नाही, असे राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT