Mumbai Police Viral Post 370 Biryani Pudhari
मुंबई

Mumbai Police Viral Post: '370 रुपयांची बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची एन्ट्री; एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ

Biryani Is Not Consent: मुंबई पोलिसांनी '370 रुपयांची बिर्याणी' वादावर भाष्य करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Police Biryani Is Not Consent: मुंबई पोलिसांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या '370 रुपयांची बिर्याणी' वादाचा संदर्भ घेत मुंबई पोलिसांनी केलेल्या जनजागृती पोस्टने हजारो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, या पोस्टवरून सोशल मीडियावर मतमतांतरेही दिसून येत आहेत.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये लिहिले होते, "370 रुपयांत तुम्हाला एक प्लेट बिर्याणी मिळेल. आणि तुरुंगात राहण्याची इच्छा असेल, तर मोफत जेवणही! #BiryaniIsNotConsent"

या एका वाक्यातून मुंबई पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला. एखाद्या व्यक्तीवर पैसे खर्च केल्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार मिळत नाही, हे त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. पोस्ट सोशल मीडियावर येताच ती वेगाने व्हायरल झाली. हजारो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून देशभरातील लोकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या.

नेमका काय आहे '370 रुपयांची बिर्याणी' वाद?

या वादाची सुरुवात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका शोमधील व्हायरल व्हिडिओमुळे झाली होती. शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना गुरुग्राममधील हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने आपल्या डेटिंगचा अनुभव सांगितला.

त्याने एका मुलीला बिर्याणी खायला नेल्याचे सांगितले. त्या जेवणाचे बिल सुमारे 360 ते 370 रुपये झाले होते. त्यानंतर मुलीने तिला घरी सोडण्यास सांगितल्यावर, "मी खर्च केलेले पैसे वसूल करणार," असे वक्तव्य त्याने केले होते.

Mumbai Police Post

या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी त्याच्यावर महिलांविषयी चुकीची मानसिकता असल्याचा आरोप केला. वाद वाढताच प्रणित मोरेने या प्रसंगात हस्तक्षेप न केल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर त्याने आपले इन्स्टाग्राम अकाउंट तात्पुरते बंद केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित व्यक्तीला कंपनीने काढून टाकले आहे.

मुंबई पोलिसांच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया

मुंबई पोलिसांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. चर्चेत असलेल्या विषयाचा वापर करून संमतीबाबत प्रभावी मेसेज दिल्याबद्दल अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले. अभिनेता करणवीर मेहरा, कंटेंट क्रिएटर अवेझ दरबार आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर प्रियंका फिट यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही या पोस्टचे स्वागत केले.

समर्थकांच्या मते, सोशल मीडियाच्या भाषेत दिलेला हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी ठरला. #BiryaniIsNotConsent हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

मात्र, काहींनी यावर टीका केली. संमतीसारख्या गंभीर विषयावर चर्चा करताना पोलिसांनी विनोदी शैलीचा वापर टाळायला हवा होता, असे काही नेटकऱ्यांचे मत आहे.

त्यांच्या मते, अशा संवेदनशील विषयाचे 'व्हायरल कंटेंट'मध्ये रूपांतर झाल्याने त्याचे गांभीर्य कमी होण्याचा धोका असतो. तरीही, या पोस्टमुळे संमती, महिलांचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT