मुंबई: पार्टी, कॉन्सर्ट आणि संगीत महोत्सवांच्या गर्दीत अमली पदार्थांचे सेवन व वितरण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. अंमली पदार्थविरोधी कक्षासाठी दाखल झालेल्या विशेष मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने पहिल्याच मोहिमेत १२ जणांचे अमली पदार्थ सेवन उघड केले.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे २२ नोव्हेंबरला झालेल्या ‘एडीन’ लाईव्ह म्युझिक कार्यक्रमात ही व्हॅन तैनात केली होती. कार्यक्रमाला आलेल्या तरुणांची अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यात अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळलेल्या १२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
अमली पदार्थांची तस्करी, वितरण आणि सेवन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाला ‘अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ नोव्हेंबर रोजी या व्हॅनचे उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महालक्ष्मी रेसकोर्सवरील कार्यक्रमात तिचा वापर करण्यात आला.
व्हॅनमध्ये कारवाईचे छायाचित्रण आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्याची सुविधा आहे. ३६० अंश फिरणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने घटनास्थळावरील हालचाली, नमुने संकलित करण्याची प्रक्रिया आणि कारवाईचे चित्रीकरण करता येणार आहे. तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे डिजिटल पुराव्यांची सुरक्षित नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे तपासादरम्यान पुराव्यांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येईल.
३० ते ३५ हजारांच्या गर्दीवर लक्ष
मोठ्या कॉन्सर्ट आणि संगीत महोत्सवांच्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन किंवा वितरण करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. ३० ते ३५ हजार लोकांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमांमध्येही संशयितांची तपासणी, नमुने संकलित करणे आणि प्राथमिक विश्लेषण करणे या व्हॅनमुळे शक्य होणार आहे.
घटनास्थळी संशयित पदार्थांची तपासणी
या व्हॅनमध्ये ट्रूनार्क, जेमिनी आणि ड्रेगर ड्रग टेस्ट ५००० यांसारखी अत्याधुनिक उपकरणे आहेत. जेमिनी उपकरणात अमली पदार्थांसह त्यांची निर्मिती करण्यासाठी वापरली जाणारी पूर्वद्रव्ये आणि विविध रसायनांचा डेटाबेस उपलब्ध आहे.
फॉरेन्सिक व्हॅनची प्रमुख वैशिष्ट्ये
ट्रूनार्क : रॅमन लेझर तंत्रज्ञानाद्वारे संशयित पदार्थांची ओळख.
जेमिनी : अमली पदार्थ, पूर्वद्रव्ये आणि विविध रसायनांच्या तपासणीसाठी डेटाबेस.
ट्रूनार्क यंत्रणेत १,३२५ प्रकारच्या अमली पदार्थांचा डेटाबेस आहे. रॅमन लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीने पॉलिथिनचे पॅकिंग न उघडताही त्यातील पदार्थाची प्राथमिक ओळख पटविता येते. त्यात सुमारे १५ हजार प्रकारच्या पदार्थांचा डेटाबेस आहे. अमली पदार्थ, त्यांची निर्मिती करण्यासाठी वापरली जाणारी पूर्वद्रव्ये आणि घातक रसायनांची ओळख पटविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.- रोहित साळी, व्हॅनवरील पोलीस अधिकारी, अंमली पदार्थविरोधी कक्ष