Mumbai Police
मुंबई : सोशल मीडियावर हरवलेल्या मुलांसंबंधी पाठवण्यात येणारे संदेश खरे नाहीत. मुंबई पोलीस हरवलेल्या प्रत्येक बालकाविरुद्धच्या तक्रारी अतिशय गांभीर्याने घेतात. गेल्या पाच वर्षांत अपहरण झालेल्या ९८ टक्के बालकांना (१८ वर्षांपर्यंतच्या) यशस्वीरित्या त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेटवले आहे, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोणतीही माहिती खात्री न करता पसरवणे टाळावे आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात म्हटले आहे की, बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध भारत सरकार यात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या सर्व प्रकरणांची नोंद अपहरणाचे गुन्हे म्हणून केली जात आहे. आमचे प्रयत्न अविरतपणे सुरू असतात आणि जोपर्यंत प्रत्येक हरवलेल्या बालकाचा शोध लागत नाही तोपर्यंत शोध थांबत नाही. अलीकडील एक उदाहरण म्हणजे वाराणसीतून एमआरए मार्ग पोलीस स्टेशनने सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षांच्या मुलीला सुखरूप परत आणले. आमच्यासाठी प्रत्येक मूल, प्रत्येक कुटुंब महत्त्वाचे आहे आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आमच्या संकल्पावर आम्ही ठाम आहोत. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आणि तातडीने कारवाई सुनिश्चित करण्यासाठी गुन्हे शाखा, स्थानिक युनिट्स आणि विशेष कक्ष यासह अनेक पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
लहान मुले पळवण्याच्या प्रश्नावर ठोस कृती करा
राज्यात लहान मुले पळविणे आणि बेपत्ता होण्याच्या घटनेत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम्वर चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असे वाटत नाही, असा टोला लगावताना राज्य सरकारने याप्रकरणी ठोस कृती करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी जाहीर पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.