नागपूर : गेल्या 30- 40 वर्षात लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे, यासाठी संघर्ष केलाय, त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते. आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले. नागपूर मॉडेलचा जीआर आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. एमएमआर वगळता महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत, त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे दिले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर येथे आज ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "ज्यांचे घर कच्चे आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत पक्के घर बांधण्यासाठी पैसेही देण्यात येणार आहेत. सध्या सुमारे 25,000 लाभार्थ्यांना पट्टे देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया सुरू आहे. या पट्ट्यांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की हे 'बँकेबल' आहेत, म्हणजेच कर्ज काढण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या खासगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात, ते सगळे अधिकार या पट्ट्यांना दिलेले आहेत."