Mumbai Police AI Investigation System Pudhari
मुंबई

Mumbai Police AI Investigation System: गुन्हे तपासासाठी एआयच्या मदतीने ‘सारथी’ प्रणाली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गुन्ह्याच्या तपासासाठी एआयच्या मदतीने ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे.

नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया ‘एंड-टू-एंड डिजिटल’ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येण्यास मदत होणार आहे.

स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली, सिटिझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, अशी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई पोलिसांना डीजी आयडी स्मार्ट कार्ड हे स्मार्ट ओळखपत्र देण्यात येणार आहे.

पोलिसांच्या विविध अधिकृत ॲप्‍लिकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार व अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेटची सुविधा देण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन देण्यात आले आहे.

नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटिझन ॲपची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT