Mumbai Police Crime Detection Pudhari
मुंबई

Mumbai Police Crime Detection: मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी; ८५ टक्के गुन्हे उघडकीस, ५५९ फरार आरोपींना अटक

गेल्या सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही मोठे यश, ८०३९ चोरीचे मोबाईल शोधले

पुढारी वृत्तसेवा

महेश पांचाळ

मुंबई: गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई पोलिसांनी यंदा तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा वेग वाढविला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आर्थिक फसवणुकीतील रक्कम तातडीने गोठविणे, अमली पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि वर्षानुवर्षे फरार असलेल्या आरोपींचा माग काढणे, अशा विविध आघाड्यांवर पोलिसांनी आक्रमक मोहीम राबविली.

१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत मुंबईतील ८५ टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, मुंबई पोलिसंची ही गेल्या सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. खुनाच्या ९९ टक्के, खुनाच्या प्रयत्नांच्या आणि दरोड्यांच्या १०० टक्के, तर जबरी चोरीच्या ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला मुंबई पोलिसांनी प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबई पोलिसांच्या आठ महिन्यांतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तपासातील महत्त्वाच्या बाबी तसेच गुन्हेगारीविरोधातील आगामी कारवाईची दिशा स्पष्ट केली.

मोक्काअंतर्गत ११ गुन्हे दाखल; ६१ आरोपी अटकेत

संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी मोक्का कायद्यांतर्गत ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात ६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक प्रकरण अमली पदार्थांशी संबंधित आहे. संघटित गुन्हेगारीच्या टोळ्यांवर कारवाईचा हा वेग कायम ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

बेकायदा बांगलादेशीं-विरोधातील कारवाईचा वेग

मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईलाही यंदा वेग आला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत १,०६६ बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले. २०२५ मध्ये संपूर्ण वर्षात १,०६१, तर २०२४ मध्ये केवळ १६४ जणांना हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ऑगस्टअखेरच मागील वर्षाचा आकडा ओलांडला आहे.

चोरीच्या मोबाईलचा ‘सीईआयआर’ने शोध

चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला. आतापर्यंत ८,०३९ मोबाईलचा शोध घेण्यात आला असून, ब्लॉक केलेल्या मोबाईलपैकी ५१.१३ टक्के मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अमली पदार्थांच्या नेटवर्कला हादरा

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातही पोलिसांनी व्यापक मोहीम राबविली. २०२४ पासून ३ हजार ०५२ प्रकरणांत ६ हजार ३७१ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे १ हजार ६०६ कोटी रुपये आहे. अमली पदार्थ निर्मितीचे ११ कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

या नेटवर्कमधील पाच प्रमुख आरोपींना २०२५-२६ मध्ये प्रत्यार्पण किंवा हद्दपारीनंतर भारतात आणून अटक करण्यात आली. सराईत अमली पदार्थ तस्करांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी PITNDPS कायद्याचा वापरही वाढविण्यात आला आहे. २०२४ पासून १६ आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले असून, त्यापैकी १३ जणांवर यंदा कारवाई झाली.

४९ आरोपी २० वर्षांपासून फरार

वर्षानुवर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या वाँटेड आणि फरार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. आठ महिन्यांत ५५९ फरार आरोपींना अटक करण्यात आली. यातील तब्बल ४९ आरोपी २० वर्षांहून अधिक काळापासून फरार होते. जुन्या गुन्ह्यांच्या तपासाला पुन्हा गती देत या आरोपींचा शोध घेण्यात आला.

“गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचणे ही मुंबई पोलिसांची गेल्या सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. गंभीर गुन्ह्यांमध्येही तपासाचे प्रमाण अत्यंत चांगले आहे. सायबर गुन्ह्यांत पीडितांचे पैसे वाचविण्यासाठी तातडीने कारवाई, अमली पदार्थांच्या नेटवर्कवर प्रहार आणि फरार आरोपींचा शोध यावर पोलिसांचा सातत्याने भर राहील.”
- देवेन भारती, पोलीस आयुक्त, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT