

गणेश शिंदे
मुंबई: आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण असलेल्या गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस राहिल्याने घरगुती गणेशमूर्ती सजावट साहित्याची खरेदी सुरु झाली आहे. मुंबईतील बाजारपेठा या साहित्याने सजू लागल्या आहेत.
पर्यावरण पूरक राज महल, गोल्डन मंदिरासह गजानन मंदिराच्या मखर या सजावटीच्या साहित्याची यावर्षी क्रेझ यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्याला ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे.
मखरबरोबर लटकन, स्वागत कमान, विविध रंगी पडदे यालाही ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी सर्वच साहित्याच्या दरात सरासरी २० टक्के वाढ झाली आहेत. इंधन तेल आणि कच्च्या मालाचा वाढता दर असे कारण असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
घरगुती गणेश बाप्पांचे आगमन येत्या सोमवारी होणार आहे. त्यासाठी दादर, लालबाग, भुलेश्वर, लोहार चाळ यासह उपनगरातील बोरिवली, दहिसर, अंधेरी, घाटकोपर,मुलुंड आदी ठिकाणच्या बाजारपेठेत ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. गेले दोन दिवस सुट्टीमुळे बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या.
घरगुती गणेशमुर्ती मखर हे ५०० रुपयांपासून ते १३ हजार रुपयांपर्यत आहे. मात्र थर्माकाॅलच्या मखरऐवजी पर्यावरणपूरक अर्थात इकोफ्रेंडली मखरला ग्राहकांची बाजारपेठेत यावर्षी सर्वाधिक मागणी आहे.
शंकर, श्री स्वामी समर्थ, विठ्ठल, बालाजी, गजानन, मोरय्या, लंबोदर, सर्कल, छत्री, कमळ व आई तुळजाभवानी मंदिर अशा आकर्षक व विविध रुपातील आणि राज महल, राजमुद्रा, मोरपंख, बालाजी, गोल्डन टेम्पल अशा एक ना अनेक वेगवेगळ्या नावांनी छोट्या व मोठ्या आकाराच्या मखर आहेत.
दृष्टिक्षेपात : सजावट साहित्य, दर किती
नटराज मंदिर २५०० रुपये, लंबोदर मंदिर,२५०० रुपये
श्रीस्वामी समर्थ,कल्पवृक्ष, २५०० रुपये, त्रिशुल रबर, २५०० रुपये
आई तुळजाभवानी मंदिर, २५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यत
ग्रीन वाॅटर फाॅल (प्लेन) ३२०० रुपये-वाॅटर फाॅल (बबल) ३२०० रुपये
केदारनाथ ,२५०० रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यत
बालाजी मंदिर, ३२०० रुपयापासून ते ७२०० रुपयांपर्यत
गजानन मंदिर, ५५०० रुपये
राजमहल,(पाच बाय तीन) ९ हजार रुपये
गोल्डन मंदिर,९ हजार रुपयांपासून ते १२ हजार रुपयांपर्यत
धनलक्ष्मी (लाकूड यापासून बनवलेले,चार बाय तीन),१३ हजार रुपये
इकोफ्रेंडली मखर हे टिकाऊ व मजबूत असतात. सर्वसामान्यांना परवडणारे ५०० रुपयांपासून ते १३ हजार रुपयांपर्यंत विविधरंगी मखराचे दर आहेत.पर्यावरणपुरक मखरला ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे यावर्षी थर्मोकाॅलचे कोणतेही मखर तयार करण्यात आलेले नाही. आजअखेर सुमारे ४० टक्के हून अधिक मखर चे बुकिंग झाले आहे. प्रत्यक्ष जागेवर व घरपोच देण्याची वितरण व्यवस्था आहे.
- संजय जाधव, मखर विक्रेते दादर