FDA Action Pudhari
मुंबई

FDA Action: मुंबईतील १०८ वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा परवाना निलंबित; स्वयंपाकघरात मूत्रपात्रे, झुरळे-माश्या आढळल्या

नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह पूना क्लबवरही ‘एफडीए’ची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील १०८ वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा अन्न परवाना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने तपासणी केली असता कुलाबा येथील या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि अन्न हाताळणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. दरम्यान, मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह पुण्यातील पूना क्लबचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये अन्न साठवणुकीच्या जागेत आणि स्वयंपाकघरात मूत्रपात्रे आढळली. तिथे झुरळे आणि माश्याही आढळल्या. फ्रिजमध्ये मांसाचे रक्त दिसले.

तसेच कच्च्या शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची योग्य विभागणी केलेली नव्हती. एका ग्राहकाने कॅफेमधील झुरळे आणि घाणीबद्दल तक्रार केली होती. एफडीएने कॅफेचे स्वयंपाकघर, रेफ्रिजरेटर आणि अन्न साठवणुकीच्या जागेची तपासणी केली.

३५ पैकी ३४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही

तपासणीत फरशीवर अन्न ठेवणे, दूषित पाण्याचा वापर आणि अस्वच्छ स्वयंपाक पद्धती यांसारख्या त्रुटी आढळून आल्या. भांडी धुण्याची जागा अस्वच्छ होती आणि लाकडी कापण्याच्या फळ्या खराब अवस्थेत होत्या. कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षक कपड्यांचा अभाव असल्याचेही आढळून आले. एफडीएच्या मते, रेस्टॉरंटमध्ये ३५ अन्न हाताळणारे कर्मचारी आहेत. यांपैकी ३४ जणांना आवश्यक अन्न सुरक्षा प्रशिक्षण मिळालेले नव्हते.

पुण्यातील द न्यू पूना क्लबवर कारवाई

पुण्यातील द न्यू पूना क्लब लिमिटेडवर एफडीएने कारवाई केली आहे. क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करताना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने क्लबचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे. कॅम्प परिसरातील क्लबमध्ये तपासणीदरम्यान झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होता. तसेच अन्नसुरक्षा नियमांमधील शेड्युल ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे एफडीएने नमूद केले आहे.

मॅकडॉनल्डस्‌च्या खाद्यपदार्थात अळ्या

मॅकडॉनल्डस्‌च्या खाद्यपदार्थात अळ्या सापडल्याची घटना मुंबईतील गोरेगाव येथील सिटी सेंटर मॉलमध्ये समोर आली आहे.

वृत्तानुसार, गोरेगाव येथील मॅकडॉनल्डस्‌च्या आऊटलेटमधील खाद्यपदार्थात अळ्या आढळल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका ग्राहकाने पदार्थांत अळ्या असल्याचा व्हिडीओ चित्रित करून एफडीएकडे तक्रार केली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील ७ आस्थापनांचे परवाने निलंबित

ऑलिम्पिया कॉफी हाऊससह ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर; विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स व ए-१ जनरल अँड ड्राय फ्रूट्स, घाटकोपर पश्चिम; मिलन पंजाब, वरळी; सद्गुरू स्वीट्स, मालाड पूर्व या आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले.

राज्यभरातील मोहिमेत २७ हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर १३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT