मुंबई: मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांत ऑक्टोबर हिटचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पारा चाळिशीच्या घरात असून उष्णतेच्या लाटेचा धोका कायम आहे. सांताक्रूझ वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत शनिवारी पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला.
रविवारी (३७ थोडी घट झाली. मात्र, कमाल तापमान ३७ किंवा त्याहून अधिक अंश सेल्सिअस राहिल्याने भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सलग दुसऱ्या दिवशी यलो अलर्ट जारी केला.
मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी (३६ अंश सेल्सिअस) तापमानात थोडी घट अपेक्षित असली तरी शनिवारपर्यंत कमाल तापमान सरासरी ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. निरभ्र आकाशामुळे मोठा उकाडा मात्र जाणवणारच असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.
यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. अजून काही दिवस हीच स्थिती राहणार असून त्यानंतर तापमान काहीसे कमी होईल. मात्र, पारा हा सरासरी ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंतच राहील, असे मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातही हीच स्थिती असून उष्ण व दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. कोकण विभागातही उष्णता वाढली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिह्याला उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला गेला आहे.
तापमानात चढ-उतार
१० ऑक्टोबर ३८ अंश सेल्सिअस
११ ऑक्टोबर ३७ अंश सेल्सिअस
१२ ऑक्टोबर ३६ अंश सेल्सिअस