Mumbai Ocean Cleanup Project Pudhari
मुंबई

Mumbai Ocean Cleanup Project: समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी महापालिका- द ओशन क्लीनअपमध्ये करार

दोन खाड्यांमधून आतापर्यंत ११९.५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी आणि समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक व अन्य घनकचरा अडविण्यासाठी मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'द ओशन क्लीनअप' या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.

या करारानुसार मुंबईतील आणखी नऊ ठिकाणी आधुनिक इंटरसेप्टर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापूर्वी ट्रॉम्बे आणि मालाड खाडीमध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्रणेद्वारे सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत तब्बल ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

'द ओशन क्लीनअप' संस्थेने मालाड खाडीतील रामचंद्र नाला आणि ट्रॉम्बे खाडीतील सुभाषनगर नाला येथे ट्रॅश इंटरसेप्टर प्रणाली कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे ट्रॉम्बे खाडीतून १०२ मेट्रिक टन, तर मालाड खाडीतून १७.५ मेट्रिक टन असा एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आला आहे. या कामासाठी प्लास्टिक फिशर आणि युनायटेड वे मुंबई या संस्थांचेही सहकार्य मिळत आहे.

प्लास्टिक मुक्त विभाग मोहीम !

दरम्यान, प्लास्टिक मुक्त मुंबई करण्यासाठी महापालिकेने अनेक प्रयत्न करूनही मुंबईला प्लास्टिक मुक्त करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता प्लास्टिक मुक्त विभाग मोहीम हाती घेऊन, पालिकेच्या विभाग कार्यालयांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये त्या त्या विभागातील सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मंडई दुकान व फेरीवाल्यांकडील प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

५ ते २५ हजार रुपये दंड

दुकानदारांसह फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्यांच्यावर ५ ते २५ हजार रुपये पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार असून दुसरीकडे मुंबईतून प्लास्टिक पिशव्या मुक्त होईल, असा विश्वास पालिकेच्या परवाना विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

असा असणार दंड

पहिला गुन्हा - ५ हजार रुपये

दुसरा गुन्हा - १० हजार रुपये

तिसरा गुन्हा - २५ हजार रुपये

दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई

नऊ ठिकाणी नवीन यंत्रणा

नव्या करारानुसार दादर-धारावी नाला, पिरामल नाला, गजधरबंध नाला, मिठी नदी, ट्रॉम्बे खाडी, कलानगर नाला, राजेंद्रनगर नाला, माहुल नाला आणि मालवणी नाला अशा नऊ ठिकाणी इंटरसेप्टर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नाल्यांमधून आणि नदीप्रवाहातून अरबी समुद्रात जाणारा प्लास्टिक व तरंगता कचरा अडविण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT