

मुंबई: राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या अनेक भागांत किमान तापमानाचा पारा खाली गेला असून, थंडीची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रदेखील गारठला असून, जळगावात सलग दुसर्या दिवशी राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
उत्तरेकडून येणार्या थंड वाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश राज्यांत पारा खाली आला आहे. येत्या काही दिवसांत या राज्यांत थंडीची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढणार आहे. दरम्यान, उत्तरेकडील अनेक राज्यांत तीव्र धुकेदेखील पसरले आहे.
विदर्भात मात्र किमान तापमानाचा पारा वाढला
जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांत थंडीची लाट पसरली आहे. शनिवारी (दि. २१) सलग दुसर्या दिवशी ८ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले. बाकी जिल्ह्यांतदेखील १० अंशांपर्यंत किमान तापमान खाली आले आहे. मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यातदेखील किमान तापमान घटले आहे. विदर्भात मात्र ‘अक्वान’ वादळाच्या प्रभावामुळे किमान तापमानाचा पारा वाढला आहे.
‘अक्वान’चा जोर ओसरला
‘अक्वान’ चक्रीवादळाचा जोर ओसरला असून, त्याचे शनिवारी कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. शनिवारी हे क्षेत्र उत्तर छत्तीसगडच्या भागावर होते. यामुळे बिहार, पूर्वोत्तर राज्यांत रविवारी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहणार आहे.
राज्याच्या विविध शहरांत नोंदवलेले शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)
जेऊर १२, सांताक्रूझ १६.२, कुलाबा २१.८, पुणे ११.२, माथेरान १६.४, अहिल्यानगर १३.५, जळगाव ८, जालना १८, सातारा १२, परभणी १८.२, हर्णे २०.६, नंदुरबार १३.६, संभाजीनगर १३.८, सांगली १३.७, नांदेड १७.२, सोलापूर १७, नाशिक १०, कोल्हापूर १५.२, महाबळेश्वर १४.४, रत्नागिरी १७.२, अकोला १६.६, अमरावती १७.५, ब्रह्मपुरी २०.२, बुलढाणा १६.८, चंद्रपूर २०.६, गडचिरोली १६.६, गोंदिया १६.२, नागपूर २०.२, वर्धा २१.५, वाशिम १४.२.