मुंबई: मुंबईतील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडलगतची 11 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जमिनीचा आगाऊ ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना देण्यात आला.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. केवळ एका दिवसात 1200 पेक्षा अधिक झोपड्या हटवून प्रशासनाने 11 एकर जागा मोकळी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील गट क्रमांक 1/2 मधील ही जमीन कारागृहासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते.मुंबईची सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असल्याची भावना महसूलमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.