Mumbai blood shortage pudhari photo
मुंबई

Mumbai blood shortage : मुंबईत निगेटिव्ह रक्तगटांचा तुटवडा

ओ-निगेटिव्ह, ए-निगेटिव्ह, एबी-निगेटिव्हचा साठा अत्यल्प; काही रुग्णालयांत शून्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये एकूण रक्तसाठा उपलब्ध असला तरी निगेटिव्ह रक्तगटांच्या साठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. विशेषतः ओ-निगेटिव्ह, ए-निगेटिव्ह आणि एबी-निगेटिव्ह रक्तगटांचा साठा अत्यल्प असून, काही प्रमुख रुग्णालयांमध्ये या रक्तगटांचा साठा शून्यावर आहे. त्यामुळे गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर रक्ताची उपलब्धता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबईतील विविध रक्तपेढ्यांमध्ये ओ-पॉझिटिव्हचे ४९०, ए-पॉझिटिव्हचे २८८, बी-पॉझिटिव्हचे २६५ आणि एबी-पॉझिटिव्हचे ८१ युनिट रक्त उपलब्ध आहे. त्या तुलनेत निगेटिव्ह रक्तगटांचा साठा अत्यल्प आहे. बी-निगेटिव्हचे केवळ १२, ओ-निगेटिव्हचे ११, तर ए-निगेटिव्ह आणि एबी-निगेटिव्हचे प्रत्येकी चार युनिट उपलब्ध आहेत.

मीनाताई ठाकरे रुग्णालयात ४१८, तर शताब्दी गोवंडी रुग्णालयात २८० युनिट रक्तसाठा आहे. मात्र, या दोन्ही रुग्णालयांमध्ये निगेटिव्ह रक्तगटांचा साठा शून्य आहे. ओ-निगेटिव्हचा साठा कूपरमध्ये आठ, केईएममध्ये एक आणि कामा रुग्णालयात एक युनिट आहे. सेंट जॉर्ज, जीटी, भाभा, राजावाडी, बीडीबीए, शताब्दी कांदिवली, मीनाताई ठाकरे आणि पल्लवी शताब्दी गोवंडी येथे ओ-निगेटिव्हचा साठा शून्यावर आहे.

पॉझिटिव्ह रक्तगटांचा साठा तुलनेने समाधानकारक असला, तरी निगेटिव्ह रक्तगटांच्या तुटवड्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. विशेषतः ओ-निगेटिव्हसह इतर निगेटिव्ह रक्तगटांच्या नियमित रक्तदानाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

  • कूपर रुग्णालयात एकूण ३७० युनिट रक्तसाठा उपलब्ध असून, त्यात ओ-पॉझिटिव्ह १४७, ए-पॉझिटिव्ह ९७, बी-पॉझिटिव्ह ६९, एबी-पॉझिटिव्ह २३, ओ-निगेटिव्ह आठ, ए-निगेटिव्ह चार, बी-निगेटिव्ह १९ आणि एबी-निगेटिव्ह तीन युनिटचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT