Mumbai Sailor death AI Photo
मुंबई

Mumbai Sailor death: मुंबईत धक्कादायक घटना! नेव्ही नगरमध्ये नौदल जवानासह पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू

मुंबईतील नेव्ही नगर परिसरात नौदलातील जवान, त्याची पत्नी आणि दोन चिमुकली मुले अशा चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी घडली.

मोहन कारंडे

Mumbai Sailor death

मुंबई: मुंबईतील नेव्ही नगर परिसरात नौदलातील जवान, त्याची पत्नी आणि दोन चिमुकली मुले अशा चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १५) घडली. दोन महिन्यांचे आणि तीन वर्षांचे अशी दोन्ही मुले घरात मृतावस्थेत आढळली. प्राथमिक तपासानुसार, नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा संशय आहे. तर पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, नौदल जवानाचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच घरात दोन मुलांचे मृतदेहही आढळून आले. प्राथमिक तपासात मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. या प्रकरणातील घटनाक्रम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून, चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय, शेजारी तसेच इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. जवानाने टोकाचे पाऊल का उचलले आणि मुलांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.

भारतीय नौदलाने काय म्हटले?

या घटनेबाबत भारतीय नौदलानेही निवेदन जारी केले आहे. “कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी एका दुर्दैवी घटनेत भारतीय नौदलातील जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिसांकडून तपास सुरू असून, भारतीय नौदलाकडून तपासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे,” असे नौदलाने म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT