मुंबई : येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी - अधिकारी, 4500 स्वयंसेवकांची तसेच 22 हजार पोलिस नियुक्ती करण्यात आले आहेत.
यावेळी प्रथमच मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड लिमिटेड (बेल) या बेंगलूरू कंपनीची ही पर्यायी मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना अडथळा येत असेल, तेव्हा ही यंत्रे वापरून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. अशी 140 यंत्रे महापालिकेला उपलब्ध झाली असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी पालिकेकडून पूर्ण झाली आहे. 80 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सध्या 64 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी सुमारे 4500 स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात महिलांकडून व्यवस्थापित केलेले किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असेल. अशा केंद्रांमध्ये पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. मतदान केंद्रावर मतदाराने शक्यतो, मोबाईल न्यायचा नाही, मात्र नेलाच तर तो स्वीच ऑफ करावा लागणार आहे. असेही गगराणी यांनी सांगितले.
प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार विभागीय सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथक कार्यरत आहेत. यात स्थिर पाळत पथक निश्चित ठिकाणी तैनात करण्यात येते, ज्या मार्फत रोख रक्कम व दारूचे बेकायदेशीर वाहतूक, शस्त्रसाठ्याची वाहतूक यांवर नजर ठेवली जाते. तसेच भरारी पथक प्रभागात फिरून हे पथक काम करेल.