मुंबई : गुरुवारी मुंबई शहरात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि शुक्रवारी मतमोजणीच्या पार्श्वभूमी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनासाठी सुमारे 28 हजाराहून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, बीडीडीएस टिम, आरसीपी प्लाटून तसेच होमगार्ड आदींना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी मुंबई शहरात महानगरपालिकेची निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी मुंबई शहरात दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त, 84 सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन हजार पोलीस अधिकारी आणि पंचवीस हजार पोलीस अंमलदार यांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे.
त्यांच्यासोबत एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, बीडीडीएस टिम, आरसीपी प्लाटून तसेच होमगार्ड आदींना शहरातील संवेनशील ठिकाणी बंदोबस्ताकामी ठेवण्यात आले आहे. मुंबईकरांनी पोलीस मदतीसाठी 100 किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
10 अप्पर पोलीस आयुक्त
33 पोलीस उपआयुक्त (डीसीपी)
84 सहाय्यक पोलीस आयुक्त
3 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी
25 हजारांहून अधिक अंमलदार