

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी भारती सिंहिणीने तीन छाव्यांना जन्म दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीपालक व कर्मचाऱ्यांनी हर्षभरीत होत भारतीचे बाळंतपण केल्याचे उद्यानाचे उपसंचालक किरण पाटील यांनी सांगितले.
भारती आणि तिचा जोडीदार मानस यांना केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अदलाबदल कार्यक्रमात गुजरातच्या जुनागड येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात आले होते. वाघ, सिंह आणि बिबटे एकाच राष्ट्रीय उद्यानात सुखनैव नांदत असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकमेव राष्ट्रीय उद्यान होय.
सध्या या उद्यानात 13 वाघ आणि 5 सिंह संरक्षित परिसरात ठेवलेले असून, संपूर्ण उद्यान परिसरात 50 हून अधिक बिबटे मात्र मुक्त संचार करत आहेत. परिणामी, जगातील सर्वाधिक बिबट्यांची घनता असलेल्या ठिकाणांपैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एक ठरले आहे. त्या तुलनेत सिंहाच्या घरी क्वचित पाळणा हलतो आणि म्हणून भारती-मानस दाम्पत्याच्या घरी जन्माला आलेले तीन छावे कौतुकाचा विषय ठरले.