मुंबई: सर्वसामान्य जनतेसोबतच कलाकारांनीही मतदानासाठी सकाळी लवकर बाहेर पडून मतदान केले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत मतदान करण्यासाठी ते पुण्याहून आले होते.
भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पत्नी ट्विकल खन्नासह मतदान केले. ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान, ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार, अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी, सोहा अली खान आदींनी मतदान केले.
अभिनेता आमीर खानने मुलगा जुनैद खान, रीना दत्ता आणि आयरा खानसह मतदान केले. सुनील शेट्टीने मतदान केल्यानंतर चाहत्यांसोबत सेल्फी घेतला. अभिनेता जॉन अब्राहमने देखील आई-वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला. चित्रपट निर्माती झोया अख्तर, अभिनेत्री दिव्या दत्ता यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेता सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीतने विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केलेल्या सेलिब्रिटींमध्ये अष्टपैलू अभिनेता प्रशांत दामले, अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, हास्यजत्रा फेम समीर चौगुले, निखिल बने, गौरव मोरे, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, अमेय वाघ, आदेश बांदेकर, गायक अभिजीत सावंत आणि त्याची पत्नी शिल्पा सावंत, सोनाली बेंद्रे, मिलींद गुणाजी, सिद्धार्थ जाधव, सुकन्या मोने, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अभिनय बेर्डे, ईशा कोपीकर, गायक कैलाश खेर, भजन सम्राट अनुप जलोटा, निर्माती किरण राव आदींचा समावेश आहे.
10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका, असे म्हणत दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोगने मतदान केले. धोमे यांचा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.
विक्रमवीर सचिन तेंडुलकरने सहकुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला. आपला विचार इथे येऊन मांडा. हीच योग्य वेळ आहे. म्हणून मी मतदान करायला आलो. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे आवर्जून मतदान करा, असे आवाहन त्याने केले.
प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदार यादीतील गोंधळामुळे मतदानासाठी विलेपार्ले येथील केंद्रावर एक तास चकरा माराव्या लागल्या. “निवडणूक आयोगाचा कारभार अत्यंत ढिसाळ आहे. मतदान केंद्रावर गेले तेव्हा तेथील यादीत माझे नावच नव्हते. मला 25 नंबरला जाण्यास सांगण्यात आले. तिथे नाव सापडले. सगळ्या सोसायट्यांचे गट येऊन मतदान करतील, असे तुम्ही ठरविले. मग आमच्या बिल्डिंगची नावे का नाहीत? माझे नाव आहे, पण सीरीज नंबरच लिहिलेला नाही. दुसरीकडे 25 नंबरवर नाव आढळले. पण मी तिकडे गेले पण तोवर निवडणूक कर्मचारी निघून गेली होती. मोबाईल आतमध्ये नेण्याची परवानगी असती तर फोटो काढला असता, असे त्या म्हणाल्या.