मुंबई : लोकसभा व विधानसभेप्रमाणे मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचेही युट्युब अथवा वृत्तवाहिनीमार्फत थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी करणारी सूचना शिवसेना ठाकरे गटाने मांडली आहे. याला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा असल्यामुळे मार्चमधील महापालिका सभागृहात ठराव मंजूर करण्यात येणार आहे.
लोकसभा राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषदमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे या कामकाजाची सर्वसामान्य जनतेलाही माहिती होते. परंतु मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराचा कारभार बघणाऱ्या मुंबई महापालिका सभागृहात थेट प्रक्षेपण होत नसल्याने शहराच्या विकासात नगरसेवकांचे योगदान काय, हे सामान्य मुंबईकरांना समजत नाही. मुंबई महापालिका ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महापालिकेवर संपूर्ण देशाचेच नव्हे तर,
अख्ख्या जगाचे लक्ष असते. मुंबई महापालिकेच्या सभागृहात तिच्या बंधनकारक व स्वेच्छाधीन कर्तव्यांशी निगडीत असे विविध प्रभागांशी संबंधित प्रस्ताव नगरसेवक साधकबाधक चर्चा करून मंजूर करीत असतात. सध्याच्या प्रचलित नियमानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या तरतुदीनुसार, महापालिकेच्या सभांतील कामकाजाचे वृत्तांत कार्यवृत्त पुस्तिकेत केवळ नोंद करून ठेवण्याची तरतूद आहे.
सुमारे 80 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण युट्यूब व प्रसारमाध्यमांमार्फत करण्यात यावे, अशा ठरावाची सूचना शिवसेनेचे (उबाठा गट)नगरसेवक अंकित प्रभू यांनी मांडली आहे. ही ठरावाची सूचना मुंबई महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मार्चमध्ये ठेवण्यात येणार आहे. या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी ती महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेच्या कामकाजाचेही थेट प्रक्षेपण यूट्यूब अथवा एखाद्या वृत्तवाहिनीवर मुंबईकरांना बघायला मिळणार आहे.
राज्यातीलच नाही तर देशातील कोणत्याच महापालिकेमध्ये सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जात नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत अशा प्रकारे थेट प्रक्षेपण करता येईल का, याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.