Mumbai Municipal Corporation pudhari photo
मुंबई

Mumbai Municipal Flats: महसूल वाढीसाठी मुंबई महापालिका सदनिका विक्रीच्या व्यवसायात

बिल्डरांकडून मिळालेल्या फ्लॅटची थेट विक्री; दरवर्षी 300-400 कोटी उत्पन्नाचे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महसूल वाढवण्यासाठी आता मुंबई महापालिका म्हाडाप्रमाणे सदनिका विकण्याच्या व्यवसायात उतरली आहे. पण म्हाडाप्रमाणे इमारती न बांधता विविध बिल्डरांकडून मिळालेल्या सदनिका थेट विक्रीला काढण्यात येणार आहेत. यातून दरवर्षी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत सरकारकडून जीएसटीपोटी येणाऱ्या अनुदानासह मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास नियोजन व अन्य मार्ग आहे. पण वाढता खर्च व शहरात सुरू असलेली विकासकामे लक्षात घेता सध्या मिळणारे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत तरतूद केलेल्या नियमानुसार मुंबई शहरात एखादी इमारत उभी केली जात असेल तर त्यातील काही सदनिका महापालिकेला द्याव्या लागतात.

याअंतर्गत महापालिकेला 426 सदनिका मिळाल्या होत्या. या सदनिकांची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महापालिकेला मिळणाऱ्या अशा प्रकारच्या सदनिकांमुळे महापालिकेला बांधकामांचा खर्च येत नाही. मात्र सदनिकांच्या विक्रीतून थेट पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा होतात. महसूल वाढवण्यासाठी हा व्यवसाय उत्तम असल्याचे मत, मालमत्ता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

चालू वर्षात 300 कोटींचे उत्पन्न

मुंबई मनपात 426 सदनिकांसाठी काढलेल्या ऑनलाईन सोडतीत 2,151 अर्जदार पात्र ठरले. यातील 373 अर्जदारांना विजेते ठरवण्यात आले असून 362 अर्जदारांची निवड करून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. यातून चालू आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेच्या तिजोरी 300 कोटी रुपये जमा होतील, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

25 लाख ते 1 कोटीपर्यंत दर

मुंबई महापालिकेतर्फे विकल्या जाणाऱ्या सदनिकांचा दर सरासरी 25 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असणार आहे. काही भागात हा दर 25 लाखापेक्षा कमी तर काही भागात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT