

मुंबई : महानगरपालिका रुग्णालयांमधील आपत्कालीन विभागातील (कॅज्युअल्टी) रुग्णसेवा अधिक शिस्तबद्ध आणि जलद करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नवीन ‘कॅज्युअल्टी प्रोटोकॉल’ लागू केला आहे. या संदर्भात सेकंडरी हेल्थ केअर सर्व्हिसेस विभागाकडून सर्व महानगरपालिका रुग्णालयांना परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या प्रोटोकॉलनुसार कॅज्युअल्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तातडीने वैद्यकीय अधिकारी किंवा पीजी बॉन्डेड डॉक्टरांकडून उपचार दिले जाणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ कॅज्युअल्टीमध्ये थांबवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार सर्व मेडिको-लीगल केस (एमएलसी) नोंदी व्यवस्थित आणि पूर्ण तपशीलासह करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, जखमेचा तपशील तसेच एक्स-रे क्रमांक यासह इतर सर्व माहिती नोंदविणे आवश्यक राहणार आहे.
गंभीर रुग्णांच्या बाबतीत प्रथम त्यांची प्रकृती स्थिर करूनच एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्या कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णाला संबंधित विभागात तातडीने दाखल करण्याची जबाबदारी कॅज्युअल्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राहणार आहे. तसेच इतर रुग्णालयात हलविण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी ट्रान्सफर मेमो तयार करणे अनिवार्य करण्यात आले असून रुग्णाला रुग्णवाहिकेद्वारेच हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे परिपत्रक सेकंडरी हेल्थ केअर सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांनी पाठविले आहे.