Sanjay Raut on Devendra Fadnavis
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज (दि. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "भाजपने हिंदू-मुस्लिम मुद्द्याशिवाय लढवलेली एकतरी निवडणूक दाखवावी, मी तुम्हाला ११ लाख रुपये देतो," असे आव्हानच त्यांनी फडणवीसांना दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्यासाठी एवढं केलं, त्यावेळी तुम्ही आमच्यासोबतच होतात ना?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नावाखाली एक धोंडा बांधून घेतला आहे, तो त्यांना बुडवणार. त्यांनी सच्चा मित्र गमावला. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना हिंदुत्व शिकवलं. मातोश्रीची बदनामी थांबवा. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलानगरच्या गेटवर आणायला जाईल, ते व्यक्तिगत शत्रू नाहीत. ते बोलत आहेत हे अतिरंजित आहे, राजकारणात देवाणघेवाण होते. आम्ही तेव्हा एकत्र होतो, महापालिका वेगळे लढलो. त्यांनी या अतिरंजित गोष्टी थांबवाव्या, असेही आवाहनही राऊतांनी केले.
यावेळी संजय राऊत म्हणाले, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. भाजपला वाटतं जनता मूर्ख आहे, त्यांना वाटतं हम करे सो कायदा. आपटे संशयित आरोपी आहे. त्याला स्वीकृत नगरसेवक करतात, त्यांच्यात एवढं धाडस येते कुठून, निवडणुकीनंतर यावर संशोधन करणार असलोही त्यांनी सांगितले.
डॉ. संग्राम पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेत असे सुरू आहे, इस्लाममध्ये असे सुरू आहे, तुम्ही कायद्याचे पालन करता का? भारतात हे सुरू झाले असेल तर त्यांनी मुस्लिम कायदा स्वीकारला आहे का? हे सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
जुने जाणते निष्ठावंत असतात ते पक्षांतर करत नाहीत, ज्याच्या मनात स्वार्थाचा अंकुर फुटतो ते जातात, एकनाथ शिंदे, राणे, भुजबळ, हे निष्ठावंतच होते.. मात्र गेले अमित शहा यांचे बूट चाटायला, अशा शब्दांत त्यांनी दगडू सपकाळ यांनी ठाकरे गट सोडण्याच्या भूमिकेवर भाष्य केले.