

खंजीर खुपसले : संजय राऊत
मुंबई : बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आमच्यासमोर लढा, आम्हीही लढायला तयार आहोत. तुम्ही चिन्ह, पक्ष चोरला तरीही आम्ही तुमच्याशी लढतो आहोत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आयुष्यभर पाठीत खंजीर खुपसण्याचे उद्योग केले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
ठाण्यात शिवसेना (ठाकरे सेना) पक्षाच्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी उचलले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेले होते. त्यानंतर संबंधित उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यासंदर्भात ठाकरे सेनेचे नेते राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेऊन पोलिस शिवसेनेच्या उमेदवाराला हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच दाखवले.
पोलिसांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसही ते काम आपल्या वर्दीची शान न राखता इमानेइतबारे करत आहेत. परंतु, निवडणूक आयोगासमोर हे चित्र आल्यावर ते आता काय करणार? असा सवालही राऊत यांनी केला आहे. उमेदवारांना अशाप्रकारे नेत आहात, म्हणजे सत्ताधारी शिवसेना किंवा मनसेला घाबरलेले आहेत. तुमच्यासमोर ते लढायला नको आहेत. तुम्ही मशाल, इंजिन याची भीती घेतलेली आहे, असे राऊत म्हणाले.