मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांना आपल्या उमेदवारांची नावे प्रतिज्ञापत्रासह शुक्रवारपर्यंत पालिका आयुक्त कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. तरच आयुक्त कार्यालयामार्फत उमेदवारांच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी होऊन, ही नावे सचिव विभागाला सादर करणे शक्य होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यासाठी राजकीय पक्षांना अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. यात उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यानंतर त्या उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासह नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी लागणारी कागदपत्रे सादर करावी लागतात. येत्या 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार आहे.
ही कागदपत्रे सादर झाल्यानंतर महापालिका आयुक्त कार्यालयाला अर्जाच्या छाननीसाठी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची यादी बंद पॉकेटमध्ये सील करून ती सचिव विभागाला सादर करण्यात येतात. सचिव विभागाला स्वीकृत नगरसेवकांचा बंद लखोटा सादर झाल्यानंतर हा लखोटा महापालिका सभागृहाच्या वेळी महापौरांकडे सादर करण्यात येतो. त्यानंतर बंद असलेला लखोटा सभागृहाला दाखवल्यानंतर तो लखोटा नगरसेवकांच्या साक्षीने फोडला जातो. त्यानंतर महापौर स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करतात.
स्वीकृत नगरसेवक कोणाला मिळणार याबाबत कुठेही पक्षाकडून वाच्यता न करता ती नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्याला स्वीकृत नगरसेवक पद देण्यात येणार आहे. त्यालाच पक्षाकडून कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ नाराजी पसरू नये म्हणून ही गुप्तता बाळगण्यात येणार असल्याचे एका नेत्याने सांगितले.