Mumbai Municipal Commissioner Pudhari
मुंबई

Mumbai Municipal Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे; इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

भूषण गगराणी सेवानिवृत्त; ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांच्या हाती मुंबई महापालिकेची सूत्रे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित झाले आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान भिडे यांनी मिळवला. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत असून त्यांच्याकडून अश्विनी भिडे सूत्रे स्वीकारतील.

महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने शुक्रवार दिनांक 27 मार्चच्या अंकात सर्वप्रथम दिले होते. मधल्या दिवसांमध्ये या पदासाठी चुरस वाढवणारी अनेक नावे चर्चेत आली. मात्र, पुढारीचेच वृत्त खरे ठरले. सोमवारी रात्री मुंबई महापालिका आयुक्तपदासह सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत, सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. बैठकीत मुंबईच्या मेट्रो वूमन अश्विनी भिडे यांच्या हाती महापालिकेची सूत्रे देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर शिंदे आणि भिडे यांच्यात तासभर चर्चाही झाली. अश्विनी भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते.

त्यामुळे भिडे यांच्यासह मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी यांची नांवे चर्चेत आली होती. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांचेही नाव उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे केले होते. पण शेवटी ते मागे पडले. मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली असून भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आपल्या विश्वासातील आणि कर्तबगार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांना करायची होती. त्यानुसार अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही मान्यता दिली.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. इक्बाल सिंह चहल यांच्या नंतर भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून प्रशासक म्हणून दोन वर्षाहुन अधिक कारभार संभाळला. भूषण गगराणी यांनी आयुक्तपदाच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न केले असल्याचे सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात बोलले जात होते.

पण राज्याचे मुख्य सचिव सोडले तर अन्य कोणत्याही सनदी अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ दिली जात नाही. तरीही भूषण गगराणी यांनी आयुक्तपदासाठी प्रयत्न केले असल्याची प्रशासनात चर्चा सुरू होती. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. असे असले तरी काही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना डावलून भिडे यांची नियुक्ती करण्यात आली अशी काही अधिकाऱ्यांची भावना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT