मुंबई: मान्सून कोकणातच रेंगाळला असून, तेथे दोन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्याने १५ जूनच्या आत मुंबईत मान्सूनची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
मान्सूनने सध्या सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे चार जिल्हे बऱ्यापैकी व्यापले आहेत. मागील तीन दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसरात तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम आहे. मात्र, पावसाला अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. वेग मंदावल्याने १५ जूननंतर किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती असली तरीही आवश्यक हवेचा जोर तसेच आर्द्रता यांची कमतरता असल्याने मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथगतीने सुरु आहे. तसेच ढगाळ वातावरण दिसत असले तरीही मोसमी पावसासाठी मोठ्या प्रमाणावर ढगांची घनता अपेक्षित असते.
त्याचा अभाव असल्यानेही त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीवर झाल्याचा अंदाज आहे. सध्या राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरच मोसमी पावसाची प्रगती होत नसल्याने राज्याच्या अंतर्गत भागात मोमसी पावसाची वाटचाल होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट
राज्यातील हवामान शुष्क अन् कोरडे झाल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भाला दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मान्सून सध्या सोलापूर-बारातमी भागात अडखळला असून १८ जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही. शनिवारी विदर्भातील अकोला येथे ४३.५ अंश तापमानाचा नोंद झाली आहे.
उत्तर भारतातून आलेल्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सून अडखळला आहे. हवेचा दाब, वाऱ्यांची दिशा सध्या अनुकूल नाही. तसेच उष्ण वाऱ्यांनी हवेतील बाष्प शोषून घेतल्याने हा परिणाम झाला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे अलर्ट पूर्ण क्षीण झाल्याने जून महिन्यातही प्रचंड उकाडा जाणवत आहे.
शनिवारचे कमाल तापमान
अकोला ४३.५, अमरावती ४२.४, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४१.९, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ४०.६, नागपूर ४१, वर्धा ४३.५, यवतमाळ ४३.२, मुंबई ३६, रत्नानगिरी ३३.५, पुणे ३५.९, लोहगाव ३६.२, अहिल्यानगर ४०, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर २५.१, मालेगाव ४२.८, नाशिक ३५.७, सांगली ३५.५, सातारा ३६.२, सोलापूर ३९.३, धाराशिव ३७.१, छत्रपती संभाजीनगर ३९.३, परभणी ४०, बीड ३९.५.